Why Popular Actor Vikas Patil not working: ‘गोळा बेरीज’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘तुकाराम’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘तुझ्याविन मरजावा’, ‘वर्तुळ’, ‘अशी बायको हवी’, ‘गडबड झाली’, अशा अनेक मालिका आणि चित्रपटांतून अभिनेता विकास पाटीलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
याबरोबरच तो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातदेखील दिसला होता. त्यानंतर तो कोणत्याही मालिका, सिनेमा किंवा वेब सीरिजमध्ये फारसा दिसला नाही. त्यामुळे यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. आता स्वत: विकास पाटीलने तो सध्या का काम करत नाही, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
“सध्या मी माझ्या आयुष्यात…”
विकास पाटीलने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत विकास म्हणाला, “सध्या मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर आहे, मला वाटतं की हा टप्पा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे येतो. एका टप्प्यावर येऊन कलाकार हा विचार करतो की, आपण नक्की काय केलं पाहिजे. करिअरच्या या टप्प्यावर येऊन पुढचा प्रवास कसा असला पाहिजे, यावर कलाकार विचार करतो. मी गेली खूप वर्षे टेलिव्हिजनवर काम केलं आहे.
अभिनेता पुढे म्हणाला, “मी चित्रपट केले, नाटकातही काम केलं. आता काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूया, असा थोडासा विचार होता. थोडं नाटक आणि सिनेमावर लक्ष केंद्रित करूयात; विशेषत: सिनेमावर लक्ष केंद्रित करूया, असा विचार केला. नाटकात काम तर करायचं होतं, पण सतत १०-१२ वर्षे टीव्हीवर काम केलं, त्यामुळे नाटकाला जितका वेळ द्यायचा होता तितका देता आला नाही. त्यामुळे आता विचार केला की थोडं थांबूया. नेमकं काय करायचं आहे, यावर विचार करूयात. जे आवडेल, मला सुख देईल किंवा आव्हानात्मक वाटेल ते करायचा प्रयत्न करूया, म्हणून काही दिवस थांबलो आहे. याला मी ब्रेक म्हणणार नाही, पण थोडा निवांत आहे.”
“खूप जास्त संयम…”
या प्रक्रियेत संयम किती महत्त्वाचा आहे? यावर विकास म्हणाला, “खूप जास्त संयम ठेवण्याची गरज असते. मला नेहमीच असं वाटतं की, जेव्हा एखादा कलाकार त्याच्या करिअरची सुरुवात करतो, तेव्हा त्याचा सुरुवातीचा संघर्ष असतो तो काम मिळविण्यासाठी असतो. एकदा काम मिळायला लागलं, थोडी ओळख मिळाली की मग मनासारखं काम मिळविण्याचा संघर्ष सुरू होतो; जो मला वाटतं की प्रत्येक कलाकाराला कुठे ना कुठे वाटतं की आपल्याला अशी एखादी भूमिका साकारायची आहे.
“माझी सुरुवात नाटक, एकांकिका यामधून झाली. पण, इतके वर्षे ते करता आलं नाही. टेलिव्हिजनमध्ये काम केल्याने एक ओळख निर्माण झाली. आयुष्यात एक स्थिरता आली. आर्थिक, भावनिक तसेच कौटुंबिकदृष्ट्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्या, त्यामुळे आता असं वाटलं की आता जरा थांबून काही गोष्टींचा विचार करूया की काही वेगळं काही करता येईल का, या विचाराने सध्या काम का करत नाही, हे अभिनेत्याने स्पष्ट केले.
आता विकास पाटील आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.