Taarak Mehta ka ooltah chashmah fame Actor: ‘बिग बॉस’ हा सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो मानला जातो. सलमान खानने अनेक वर्षांपासून या शोच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळली आहे.

विविध क्षेत्रांतील नामंवत चेहरे या शोमध्ये सहभागी होतात. मोठ्या प्रमाणात टीव्हीवर दिसणारे अनेक लोकप्रिय कलाकार या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होतात. या शोमध्ये होणारे टास्क, स्पर्धकांमधील भांडणे यामुळे रोज काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील ‘हा’ अभिनेता बिग बॉस १९ मध्ये दिसणार?

नुकताच कलर्स वाहिनीने बिग बॉस १९ चा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये सलमान खानने लवकरच हा शो प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. आता या शोमध्ये स्पर्धक कोण असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. कोणते कलाकार या शोमध्ये दिसणार याचे अंदाजदेखील बांधले जात आहेत.

आता एका कलाकाराची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेता गुरुचरण सिंग बिग बॉसच्या १९ व्या सीझनमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार गुरुचरण सिंग या शोचा भाग असणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अभिनेत्याने अधिकृतरित्या याविषयी काहीही माहिती दिली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षी गुरुचरण सिंग हे काही दिवस बेपत्ता होते, त्यामुळे ते मोठ्या चर्चेत आले होते. त्यानंतर आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला होता. आता अभिनेता बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये दिसणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेबद्दल बोलायचे तर मालिकेला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सर्व कलाकार एकत्र जमल्याचे पाहायला मिळाले. मालिकेला मिळत असलेल्या यशाबद्दल आणि प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.