Yeu Kashi Tashi Me Nandayla Fame Actress Masters Degree : मनोरंजन क्षेत्रात काम करत असतानाच अनेक कलाकार त्यांच्या शिक्षणालाही तितकंच महत्त्व देतात. बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमधीलही अनेक कलाकार मंडळीही उच्च शिक्षित आहेत. काहींचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि काही जण अजूनही शिक्षण घेत आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीनंसुद्धा नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर.

टेलिव्हिजनवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री अन्विता फलटणकर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिनं साकारलेली स्वीटू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मुख्य अभिनेत्री म्हणून अन्विताची ही पहिलीच मालिका होती. मालिका संपल्यानंतर अन्वितानं शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा निर्णय घेतला आणि ती ऑस्ट्रेलियाला गेली.

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अन्विता फलटणकर सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. परदेशातूनही ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिनं एक आनंदाची बातमी सांगितली आहे, ती म्हणजे अन्वितानं नुकतीच पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्रीनं ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न’मधून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. नुकताच तिचा दीक्षांत समारंभ पार पडला आणि त्याचे खास फोटो अन्वितानं सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. ‘मी माझी मास्टर्स डिग्री पूर्ण केली’, अशी कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या दीक्षांत समारंभसाठी अन्वितानं खास राखाडी रंगाची साडी नेसली होती.

अन्विताच्या या पोस्टवर चाहत्यांसह लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच, अनेक कलाकारही कमेंट्सद्वारे अभिनेत्रीचं कौतुक आणि अभिनंदन करत आहेत. निमिश कुलकर्णी, मेघना एरंडे, दीप्ती केतकर यांच्यासह अनेकांनी तिला “अभिनंदन”, “शुभेच्छा”, “तुझा अभिमान वाटतो”, “तू चाल पुढं” अशा प्रतिक्रियांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अन्विताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेशिवाय ‘गर्ल्स’, ‘टाइमपास’ आणि ‘यु टर्न’ यांसारख्या सिनेमात दिसली होती. तसेच तिने ‘रुंजी’ आणि ‘चतुर चौकडी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ नंतर ती आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करताना दिसली.