अलीकडच्या काळात सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामच्या ‘आस्क मी सेशन’मध्ये ‘झी मराठी’च्या लोकप्रिय नायिकेने प्रेमाची कबुली दिली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे ईशा संजय. ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेमुळे ईशा घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामध्ये ती सूर्या दादाच्या बहिणीची म्हणजेच राजश्री ( राजू ) ही भूमिका साकारत आहे.
ईशाला एका नेटकऱ्याने “तुझं लग्न झालंय का दीदी?” असा प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्रीने अमेय नारकरबरोबरचा फोटो शेअर करत नेटकऱ्याला, “लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या” असं उत्तर दिलं होतं. यामुळे दोघंही लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहेत हे स्पष्ट झालं होतं. यासह आता अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ देखील चर्चेत आला आहे.
अमेय हा ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा आहे. सध्या अमेय परदेशात उच्चशिक्षण घेत आहे. त्यालाही इंडस्ट्रीत करिअर करायचं आहे. असं ऐश्वर्या यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. नुकताच तो भारतात परतला आहे. यावेळी एअरपोर्टवर त्याचं स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन ईशा पोहोचली होती. अमेयला अनेक महिन्यांनी पाहिल्यावर तिने पटकन धावत जाऊन त्याला मिठी मारल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
ईशाने अमेय अन् तिच्या भेटीचा हा गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “…अन् हे घडलं” असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनच्या पुढे कोणाचीही नजर लागू नये म्हणून तिने इव्हिल आय इमोजी देखील दिला आहे.
स्वत: ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत लव्ह इमोजी दिले आहेत. याशिवाय तितीक्षा तावडे, अक्षया नाईक, कोमल मोरे, श्वेता खरात, अश्विनी कासार, महेश जाधव, पूर्वा कौशिक, भूमिजा पाटील अशा अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, अमेय व ईशा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मध्यंतरी या दोघांचा एकत्र डान्स करताना व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.