Zee Marathi Tarini Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर ११ ऑगस्टपासून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिका सुरू झाल्या आहेत. ‘तारिणी’मध्ये अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारत आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ‘तारिणी’ची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

शिवानी सोनार साकारत असलेली ‘तारिणी’ ही स्पेशल क्राइम युनिट ऑफिसर आहे. कुटुंबाची काळजी घेत अभिनेत्री या मालिकेत सामाजिक जबाबदारीही निभावताना दिसेल. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना शिवानी सोनारचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला होता. तिचा लूकही सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. शिवानीने तिच्या स्वभावात आणि तारिणीमध्ये नेमकं काय साम्य आहे याचा खुलासा केला आहे.

शिवानी आणि तारिणीमध्ये आहे ‘हे’ साम्य

अभिनेत्री शिवानी सोनार स्वातंत्र्य दिनानिमित्त आपलं देश प्रेम व्यक्त करताना म्हणते, “सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, मी तारिणीची भूमिका साकारत आहे जी एक अंडरकव्हर कॉप आहे आणि मला अशाप्रकारची भूमिका साकारताना खूप अभिमान वाटतोय. या मालिकेतून प्रेक्षकांना इमोशन्सपासून अ‍ॅक्शनपर्यंत सर्काहीव पाहायला मिळणार आहे. तारिणीसाठी जितकं देश प्रेम महत्वाचं आहे तितकंच ते शिवानीसाठी सुद्धा आहे. तारिणी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या माणसांवर आणि आपल्या देशावर प्रेम करणारी आहे. तिच्यासाठी शिस्त आणि नियम पाळणं खूप महत्वाचं आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील देशाचे नियम पाळण्याचा संपूर्ण प्रयत्न करते. कारण, माझे वडील पोलीस खात्यात आहेत आणि आजोबा देखील पोलीस खात्यात होते त्यामुळे ते संस्कार माझ्यावर आहेत. म्हणूनच मला वाटतं की तारिणी आणि शिवानी मध्ये ‘देशप्रेम’ हे एक खूप मोठं साम्य आहे आणि ते दाखवायची पद्धत म्हणजे नियमांचे पालन करणं.”

दरम्यान, ‘तारिणी’मध्ये शिवानी सोनारसह स्वराज नागरगोजे, अभिज्ञा भावे, सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, रुपाली मांगले, निकिता झेपाले, अंजली कदम, पंकज चेंबूरकर, ज्येष्ठ अभिनेत्री रागिणी सामंत असे बरेच कलाकार झळकत आहेत. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.