Zee Marathi Devmanus : ‘झी मराठी’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच ‘देवमाणूस’ पुन्हा येतोय अशी घोषणा केली होती. यानंतर मालिकेचे अनेक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, वाहिनीकडून अधिकृतरित्या ‘देवमाणूस’ मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली नव्हती. आपली आवडती मालिका, आपला आवडता हिरो पुन्हा केव्हा येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर सर्व प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून ‘झी मराठी’ने अधिकृतरित्या ‘देवमाणूस’ मालिकेच्या प्रक्षेपणाची तारीख अन् वेळ जाहीर केली आहे. ‘देवमाणूस’ या गाजलेल्या मालिकेचा नवीन अध्याय लवकरच एका नव्या रुपात सुरू होणार आहे.
आतापर्यंत ‘देवमाणूस’ मालिकेचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘देवमाणूस’ ( Devmanus ) मालिकेची क्रेझ घराघरांत निर्माण झाली. या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे किरण गायकवाडचा. खलनायकाची भूमिका असली तरीही प्रेक्षकांचं किरणला भरभरून प्रेम मिळालं. आता किरण पुन्हा एकदा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘देवमाणूस’ मालिका येत्या २ जूनपासून दररोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या स्लॉटला श्रेयस तळपदेचा ‘चल भावा सिटीत’ हा शो सुरू आहे. आता ‘देवमाणूस’ मालिकेची तारीख अन् वेळ जाहीर केल्यामुळे श्रेयसच्या शोमध्ये महाअंतिम सोहळा पार पडून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२० मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ( Devmanus Promo ) ही मालिका सुरू झाली. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात. पण, तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘झी मराठी’ने ‘देवमाणूस २’ ची घोषणार केली. १० सप्टेंबर २०२२ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा या मालिकेचं तिसरं पर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.