Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीने गेल्या काही दिवसांपासून नवनवीन व हटके कार्यक्रमांची घोषणा केल्याचं पाहायला मिळत आहे. छोट्या पडद्याची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते आणि गेल्या वर्षभरात ‘झी मराठी’ने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी, मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिनीवर अनेक महत्त्वाचे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘लक्ष्मी निवास’, ‘पारू’ या मालिकांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच श्रेयस तळपदेचा एक नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी वाहिनीवर १७ मार्चपासून तीन मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. श्रेयसच्या ‘चल भावा सिटीत’ या शोबद्दल उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता टीआरपीच्या दृष्टीकोनातून वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेचा नवीन अध्याय लवकरच एका नव्या रुपात सुरू होणार आहे.

३१ ऑगस्ट २०२० मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाली. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात. पण, तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘झी मराठी’ने ‘देवमाणूस २’ ची घोषणार केली. १० सप्टेंबर २०२२ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या दोन वर्षांत ‘देवमाणूस’ मालिकेची क्रेझ घराघरांत निर्माण झाली. या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे किरण गायकवाडचा. खलनायकाची भूमिका असली तरीही प्रेक्षकांचं किरणला भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे आता ‘झी मराठी’ने पुन्हा एकदा ‘देवमाणूस’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केलेली आहे.

“मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी…’देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! लवकरच…” असं कॅप्शन देत वाहिनीने या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा किरण गायकवाड कमबॅक करणार का? याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. वाहिनीने शेअर केलेला प्रोमोवर तशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. तर, अभिनेत्रीने पूर्वा शिंदेने थेट किरण गायकवाडचं नाव घेत कमेंट केली आहे. यावरून किरण कमबॅक करणार असल्याची हिंट प्रेक्षकांना मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
devmanus
देवमाणूसच्या टीझरवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, आता ‘देवमाणूस’ मालिकेचा मधला अध्याय आता केव्हा सुरू होणार, मुख्य भूमिकेत कोण झळकणार याची घोषणा ‘झी मराठी’कडून लवकरच करण्यात येणार आहे.