Zee Marathi New Serial Kamali : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘देवमाणूस’ या मालिकेची घोषणा करून या सिरियलचा मधला अध्याय २ जूनपासून सुरू होईल असं वाहिनीकडून जाहीर करण्यात आलं होतं.
‘देवमाणूस’ मालिकेच्या नव्या सीझनबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच ‘झी मराठी’ने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यामध्ये झळकणाऱ्या मुख्य अभिनेत्रीची झलक देखील सर्वांना पहिल्याच प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“पुस्तकात मन हीचं रमून जाई अन् आयुष्याचे धडे गिरवीत राही…अशी ही आमची ‘कमळी” असं कॅप्शन देत या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘कमळी’ या नव्या मालिकेत ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ फेम अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही मालिका ‘सोनी मराठी”वर प्रसारित केली जायची. जानेवारी २०२५ मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला.
नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, शहरातील कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी जाता यावं यासाठी कमळी अहोरात्र मेहनत घेत असते. तिला परीक्षेचा पेपर देखील सोपा जातो. मात्र, यादरम्यान तिची आई मुंबईतील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाण्यास तिला परवानगी देत नाही. मुंबईच्या कॉलेजचं नाव सुद्धा काढायचं नाहीस असं कमळीची आई तिला बजावून सांगते. याशिवाय लेकीचं अभ्यासाचं पुस्तक उचलून आई ते देखील चुलीत टाकते असंही या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर कमळीला अश्रू अनावर होतात.
आता कमळी मुंबईच्या कॉलेजमध्ये जाणार की नाही? याचा उलगडा प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर होणार आहे. लवकरच ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू होणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री विजया बाबरवर सध्या मराठी मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ऋतुजा बागवे, नम्रता संभेराव, सुमीत पुसावळे, शर्वरी जोग, सिद्धार्थ खिरीड अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत विजयाला या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.