Chala Hawa Yeu Dya: प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची ओळख आहे. या कार्यक्रमाचा पहिला सीझन लोकप्रिय ठरला. त्यानंतर प्रेक्षक उत्सुकतेने या कार्यक्रमाची वाट पाहत होते.
काही महिन्यांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’चे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, यावेळी या कार्यक्रमात काही बदल दिसले. चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँगवॉर असे या कार्यक्रमाचे नाव आहे. श्रेया बुगडे, गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव या पाच कलाकारांच्या पाच टीम असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकरने करत आहे.
आता झी मराठी वाहिनीने या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. लवकरच गँगवॉर बंद होणार असून आधीच्या पर्वाप्रमाणे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अभिजीत खांडकेकर म्हणतो, आता ना जजमेंट, ना कोणावर कमेंट, होणार फक्त एंटरटेनमेंट. यादरम्यान, गौरव मोरे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव तसेच कुशल बद्रिके हे वेगवेगळ्या भूमिकांत दिसत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’चा प्रोमो पाहिलात का?
अभिजीत पुढे म्हणतो, पाच विनोदवीर त्यांच्या चेल्यांबरोबर स्वत: स्कीट करणार. प्रत्येक आठवड्यात नवीन पाहुणे येणार. प्रेक्षकांना पोटधरुन हसवणार. गँगवॉर संपणार आणि मिशन कॉमेडी सुरू होणार. प्रोमोमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव व रवी जाधव यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच,श्रेयाने दुनियादारी चित्रपटातील सई ताम्हणकरचा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे श्रेयासह इतर कलाकार प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर चला हवा येऊ द्यामध्ये नेमकं काय घडणार, कोणते कलाकार या शोमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.