Zee Marathi Chala Hawa Yeu Dya Show : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने जवळपास १० वर्षे अधिराज्य गाजवलं. मार्च २०२४ मध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावेळी कार्यक्रमातील सगळेच कलाकार भावुक झाले होते. आता वर्षभराच्या ब्रेकनंतर चाहत्यांना पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय शो पाहायला मिळणार आहे.
२०१४ मध्ये ‘लय भारी’ चित्रपटाच्या निमित्ताने या शोची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला या शोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा पहिला भाग १८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. तर, शेवटचा भाग १७ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आला. डॉ. निलेश साबळे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम असे अनेक कलाकार या शोचा अविभाज्य भाग होते.
आता लवकरच सुरू होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये जुन्या कलाकारांपैकी कोण-कोण झळकणार, या शोमध्ये नव्याने कोणाची एन्ट्री होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने ‘चला हवा येऊ द्या’ शोचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये “१० वर्ष, ११३७ एपिसोड्स आणि ९ सीझननंतर कॉमेडीचं वादळ पुन्हा येतंय…” असं सांगण्यात आलं आहे.
आता या कार्यक्रमाचं स्वरुप काहीसं बदलण्यात येणार आहे. कॉमेडीचा नवीन डॉन होण्यासाठी आता ऑडिशन घेतल्या जाणार आहेत. ऑडिशन केव्हा होणार? हा शो केव्हा व कधी सुरू होणार याची अधिकृत घोषणा वाहिनीकडून अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, समोर आलेल्या टीझरमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
‘चला हवा येऊ द्या’ शोचा टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी निलेश साबळे व त्याच्या टीमला पुन्हा एकत्र आणा अशी मागणी वाहिनीकडे केली आहे. “चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची पहिली टीम चांगली होती आणि निलेश साबळे हेच चांगल्याप्रकारे हा शो चालवू शकतात”, “एक नंबर शो आहे लवकरच येऊ द्या” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.