Zee Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका लवकरच सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाईल. त्यामुळे वाहिनीवर सध्या सुरू असणाऱ्या एकूण ३ मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे.
११ ऑगस्टपासून ‘पारू’ मालिका संध्याकाळी साडेसातऐवजी सात वाजता प्रसारित केली जाईल. तर, ७ वाजता प्रसारित केली जाणारी ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सायंकाळी ६.३० वाजता ऑन एअर होईल. याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेची वेळ चौथ्यांदा बदलण्यात आली असून आता ही मालिका सायंकाळी ६ वाजता प्रसारित केली जाईल. म्हणजेच नव्या मालिकेसाठी वाहिनीने एकूण ३ मालिकांची वेळ बदलली आहे.
याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडेने खास कमेंट लिहिली आहे. सध्या मेघा ‘सावळ्याची जणू सावली’ यामध्ये भैरवी वझे ही भूमिका साकारत आहे. ३ मालिकांची वेळ बदलण्यापेक्षा ‘पारू’ची वेळ ६:३० करा, असं अभिनेत्रीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. पुढे, काही वेळातच अभिनेत्रीने प्रोमोवरची ही कमेंट डिलीट केली. मात्र, या कमेंटचा स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
मेघा धाडे लिहिते, “पारू मालिका ठेवा ना ६:३० वाजता. आमच्या सावलीचा टाइम स्लॉट का बदलत आहात… निदान ३ पैकी एका मालिकेचा टाइम स्लॉट तरी बदलणार नाही. हे करून तुम्ही ३ मालिकांचं नुकसान करताय ‘झी मराठी’ प्लीज मी विनंती करते की, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची वेळ बदलू नका.”

याशिवाय ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री दळवीने सुद्धा यावर मत मांडलं आहे. अभिनेत्रीने लिहिते, “सावळ्याची जणू सावली या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. लोकांना सुद्धा ही मालिका आवडतेय. लोक रोज न चुकता ही मालिका बघत आहेत आणि आता जर वेळ बदलली तर, हे बरोबर ठरणार नाही…झी मराठी”

दरम्यान, येत्या ११ ऑगस्टपासून वाहिनीवर हे महत्त्वाचे बदल केले जातील. कारण, याच दिवशी ‘झी मराठी’वर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. यामध्ये एक तेजश्री प्रधानची मालिका आहे. तर, दुसरी शिवानी सोनारची मुख्य भूमिका असलेली ‘तारिणी’ मालिका आहे.