Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar: टीव्ही मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही क्षेत्रांत दिसणारे कलाकार हे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. प्रेक्षकांना खळखळून हसवण्याबरोबरच अनेकदा ते त्यांच्या काही खासगी गोष्टीदेखील चाहत्यांबरोबर शेअर करतात.
किरण गायकवाडने पत्नीसह शेअर केला खास व्हिडीओ
आता अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये किरणने पत्नी वैष्णवी कल्याणकरबरोबर काही खास क्षण शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाच्या वेळच्या काही व्हिडीओ क्लिप्स यामध्ये दिसत आहेत.
संगीत, हळद, तसेच लग्नाच्या विधीमधील या व्हिडीओ क्लिपमध्ये हे जोडपे एकत्र दिसत आहे. त्याबरोबरच इतर ठिकाणच्या त्यांच्या काही व्हिडीओ क्लिप्स पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांबरोबर आनंदी असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तसेच रांझणा हे गाणे ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘माझ्या रांझणाबरोबर’ अशी कॅप्शन दिली आहे. तसेच वैष्णवी कल्याणकरच्या अकाउंटला टॅग केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
किरण गायकवाडच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “छान जोडी”, “जेव्हा पुरुष त्याच्या आवडत्या स्त्रीबरोबर असतो”, “सुंदर जोडपे”, अशा काही कमेंट्स दिसत आहेत. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.



किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर यांनी १४ डिसेंबर २०२४ ला लग्नगाठ बांधली. त्यावेळी अभिनेत्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी उपस्थित होत्या. त्यांच्या लग्न समारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ कलाकारांनी त्यावेळी सोशल मीडियावर शेअर केले होते. किरण व वैष्णवी अनेक सोशल मीडियांवर एकमेकांप्रति प्रेम व्यक्त करताना दिसतात. ते फोटो शेअर करतात. तसेच, त्यांनी काही मुलाखतींमध्येदेखील एकमेकांबाबत वक्तव्य केले आहे.
किरण गायकवाडने मालिका व चित्रपटांत काम करीत त्याची ओळख निर्माण केली आहे. लागिरं झालं जी या मालिकेत त्याने साकारलेली भय्यासाहेब ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर त्याने देवमाणूस या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारली. या भूमिकेने अभिनेत्याला मोठी लोकप्रियता मिळाली. देवमाणूस या मालिकेलाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
आता सध्या ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या भूमिकेतून अभिनेता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे.