Devmanus Madhla Adhyay fame Kiran Gaikwad: काही मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा असतो. मालिकेचा एखादा सीझन गाजला की, त्याचे पुढचे सीझन पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आता देवमाणूस ही अशाच मालिकांपैकी एक असल्याचे दिसते.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लोकप्रिय मालिकांपैकी देवमाणूस ही एक मालिका आहे. सध्या या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘देवमाणूस-मधला अध्याय’ असे या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचे नाव आहे. देवमाणूसच्या तीनही सीझनमध्ये अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत आहे.

पहिल्या दोन सीझनमध्ये दाखविल्याप्रमाणे महिलांना फसवून, त्यांच्याकडील दागिने व‌ पैसे घ्यायचे आणि त्यांना मारून टाकायचे, असे हे पात्र आहे. विशेष म्हणजे इतरांच्या नजरेत तो चांगला असतो. सर्वांसमोर तो असे काहीतरी काम करतो, ज्यामुळे लोक त्याला देवमाणूस समजू लागतात. लोकांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत हा व्यक्ती अनेक कट-कारस्थाने करतो आणि लोकांना मारत असतो.

“माझ्याकडून जे काही होईल, ते मी सगळं…”

आता एका मुलाखतीत किरण गायकवाडने या मालिकेतील त्याची भूमिका पाहिल्यानंतर इतर महिल्या त्याच्या आईला वाईट बोलत असत, असा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले गेले की, आईचा पाठिंबा कसा होतो? तर अभिनेता म्हणाला, “मी लागिरं झालं जी या मालिकेत काम करेपर्यंत ती धुण्या-भांड्यांचं काम करायची. ‘लागिरं झालं जी’नंतर मीच तिला म्हटलं की, आता तू हे काम करू नकोस. मी तिला सांगितलं की, माझ्याकडून जे काही होईल, ते मी सगळं तुझ्या पायाशी आणून देण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर तिनं ते काम सोडलं.”

पुढे अभिनेता म्हणाला, “माझ्या आईचा मला खूप पाठिंबा आहे. ती मला सतत फोन करीत नाही. तिला माहीत आहे की, माझा मुलगा बाहेर गेला आहे म्हणजे कामावर गेला आहे. तो घरी येणार आहे आणि तो त्याच्या वेळेनुसार येणार आहे. ती फक्त मला जेवणासाठी थांबू की नको, यासाठी फोन करते. त्यावरून तिला कळतं की, मी किती वाजता येणार आहे. मी तिला ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये तिला सांगतो. इतकं तिला माहीत आहे की, मी कसा आहे.”

“आता तिला खूप अभिमान वाटतो. ‘देवमाणूस’मध्ये मी नकारात्मक भूमिका साकारत होतो. लोकांना ते पात्र आवडायचं. लोक कौतुक करायचे; पण काही बायका आईला भेटायच्या आणि मला शिव्या द्यायच्या. आईला वाईट वाटायचं. हे सगळं मला सांगताना एकदा आई रडली होती. मला ती म्हणाली होती की, अरे, असली कामं नको करू. बायका मला खूप वाईट बोलतात. मला त्याचं आजही खूप वाईट वाटतं”, अशी आठवण किरणने सांगितली.

“मी आईला आजपर्यंत सेटवर घेऊन गेलो नाही. कारण- मी ठरवलं आहे की माझी भूमिका जेव्हा सकारात्मक असेल, त्या दिवशी आई सेटवर असेल. नकारात्मक भूमिका करताना मला तिला सेटवर घेऊन जायचं नाही. ‘डंका’चं शूट करताना ते नेमकं पुण्यात नव्हतं. पुण्यामध्ये होतं आणि ते रात्री होतं. कुठला तरी सिनेमा किंवा इतर काही प्रोजेक्ट, ज्यामध्ये मी सकारात्मक भूमिकेत असेन, त्या सेटवर मी माझ्या आईला घेऊन जाईन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘देवमाणूस- मधला अध्याय’मध्ये अभिनेता किरण गायकवाड गोपाळ ही भूमिका साकारताना दिसत आहे.