‘झी मराठी’ वाहिनीवर बहुप्रतीक्षित ‘देवमाणूस’ मालिकेचं नवीन पर्व येत्या २ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वात काय-काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक उत्सुक आहेत. देवमाणूस या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाला अभिनेता किरण गायकवाड आठवतो. या मालिकेच्या आधीच्या दोन्ही पर्वांमध्ये किरणचा जबरदस्त अभिनय सर्वांना पाहायला मिळाला होता. आता तिसऱ्या सीझनच्या निमित्ताने किरण पुन्हा एकदा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या मालिकेच्या काही भागांचं शूटिंग नुकतंच वाराणसी येथे पार पडलं. येथील शूटिंगचा अनुभव किरण गायकवाडने सांगितला आहे. भेटवस्तू म्हणून वाराणसी येथे आई अन् पत्नीसाठी साड्या खरेदी केल्याचंही त्याने सांगितलं. अभिनेता म्हणाला, “वाराणसी येथील शूटिंगचा अनुभव खूपच कमाल होता. खरंतर माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं की, कधीतरी मी वाराणसीला जावं… कारण तिकडच्या भाषेचा एक लहेजा आहे. गंगा नदीच्या किनारी वेळ घालवायचा होता आणि तिकडचं सौंदर्य अनुभवायचं होतं. जसं मला समजलं की, वाराणसीला शूटिंग आहे तेव्हा माझा उत्साह अधिक वाढला. आम्ही गेल्या सीजनला राजस्थानमध्ये शूट केलं होतं, तेव्हा मला तिकडची भाषा शिकायला मिळाली होती. याशिवाय राजस्थानी खाद्य पदार्थांचा आस्वाद देखील घ्यायला मिळाला होता.”
अभिनेता पुढे म्हणाला, “आता यंदा आम्ही ३-४ दिवसांसाठी वाराणसीला शूट केलं. त्यामुळे टाईमलाइन खूप कट टू कट होती. पण आठवणी अशा आहेत की, आम्ही ज्या ठिकाणांवर शूटिंग करत होतो तिकडची माणसं मला ओळखत होती कारण, या मालिकेचे आधीचे सीझन हिंदीमध्ये डब झाले आहेत. त्यामुळे देवमाणूसचा प्रेक्षकवर्ग, चाहतावर्ग तिथेही होता. वाराणसीमध्ये मी जवळपास ८ ते ९ किलोमीटर सलग सायकल चालवली आहे. यावेळी माझे भयंकर हाल झाले होते. सायकल जोरात चालवायची होती आणि त्यात सायकलची चेन सारखी निघत होती. २-३ वेळा मी पडता-पडता वाचलो.. तिकडे गर्दीही होती. या सगळ्या गोष्टी होत असताना आपला अभिनय, आपलं पात्र यावर लक्ष केंद्रीत करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.”

किरण गायकवाड सांगतो, “या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो. माझ्यासाठी सर्वच नवीन होतं. तिकडे मणिकर्णिका घाट आहे, राजाहरिश्चंद्र घाट आहे. सर्वांना एकत्र गंगा आरतीत तल्लीन होताना मला पाहायचं होतं. मी हे सर्व अनुभवण्यासाठी शूटिंगच्या २ दिवस आधीच वाराणसीला पोहोचलो होतो कारण, मला त्या जागेचा, तिकडच्या भाषेचा आणि लोकांच्या वावरण्याचा अभ्यास करायचा होता.”

‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड
“शूटिंग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी मी संपूर्ण गंगाघाट पूर्ण फिरलो. मला जितकी माहिती सांगितली गेली त्याप्रमाणे एकूण ८४ घाट आहेत, त्यातले ८० घाट तर मी नक्कीच फिरलो. तिथली एक स्पेशल पेहलवान लस्सी आणि कचोरी आहे… वाराणसीमधले हे दोन पदार्थ मला विशेष आवडले. नाव घेतलं तरी ती चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. आमचं एका लूममध्ये शूटिंग होतं जिथे साड्या तयार होतात, साडी बनवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणं खूप मनोरंजक होती. मी माझ्या आई आणि बायकोसाठी लूममधून काही साड्याही खरेदी केल्या.” असं किरण गायकवाडने सांगितलं.