Zee Marathi Serial Time : ‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण महिन्याभरापूर्वी दोन नव्या मालिका सुरू झाल्या. यामध्ये तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि शिवानी सोनारची ‘तारिणी’ या मालिकांचा समावेश आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या सायंकाळी ७:३० वाजता ऑन एअर केली जात आहे. नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी वाहिनीवरच्या एकूण तीन मालिकांची वेळ बदलण्यात आली होती.
सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ६ वाजता, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ६:३० वाजता आणि ‘पारू’ मालिका ७ वाजता प्रसारित केली जाते. मात्र, या वेळांमध्ये आणखी एकदा बदल होण्याची दाट शक्यता आहे. नुकताच ‘झी मराठी’चा एक कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये ‘तुला जपणार आहे’ची वेळ सायंकाळी ६:३० वाजता अशी नमूद करण्यात आली आहे. हा फोटो वाहिनीच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
‘तुला जपणार आहे’ ही थ्रिलर मालिका रात्री १०:३० वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते. ही सिरियल १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता १०:३० ऐवजी फोटोमध्ये ‘तुला जपणार आहे’च्या प्रोमोवर ६:३० ची वेळ दिसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या साडेसहा वाजता ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळे आता या मालिकेची वेळ पुन्हा बदलणार की ही मालिका संपणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


दरम्यान, ‘झी मराठी’च्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. “तुला जपणार आहे ही मालिका ६:३० ला दिसतेय…याची सारखी-सारखी वेळ का बदलत आहात? एक निश्चित वेळ ठेवा”, “आता सावलीची मालिका केव्हा दाखवणार?” असे प्रश्न युजर्सनी या पोस्टवर उपस्थित केले आहेत.