Marathi Serial TRP : सध्या छोट्या पडद्यावरील विविध वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीवर शिवानी सोनारची मुख्य भूमिका असलेली ‘तारिणी’ आणि सुबोध भावे-तेजश्री प्रधान ही स्टार जोडी एकत्र असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकांचा दुसऱ्या आठवड्यातील टीआरपी किती आहे? याशिवाय ‘स्टार प्रवाह’वरील कोणत्या मालिकांच्या टीआरपीमध्ये वाढ झालीये? जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह’वर नेहमीप्रमाणे पहिल्या स्थानी सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका आहे. याशिवाय येत्या आठवड्यात मालिकेत कल्पना सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेचं वर्चस्व कायम राहणार आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर ५.२ रेटिंगसह ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे. या मालिकेच्या रेटिंगमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत सकारात्मक वाढ झाली आहे. याशिवाय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्टार प्रवाहवरील टॉप ५ मालिका
१. ठरलं तर मग
२. घरोघरी मातीच्या चुली
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी
४. कोण होतीस तू काय झालीस तू
५. थोडं तुझं आणि थोडं माझं
‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांबद्दल सांगायचं झालं, तर ‘कमळी’ला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, या मालिकेच्या टीआरपीमध्ये सुद्धा गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगली वाढ झालेली आहे. या आठवड्यात ‘कमळी’ ३.६ रेटिंगसह ‘झी मराठी’वर पहिल्या स्थानी आहे.
‘कमळी’नंतर ‘लक्ष्मी निवास’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. तर, तेजश्री प्रधानच्या नव्याने सुरू झालेल्या मालिकेला गेल्या आठवड्यात २.६ रेटिंग मिळालं असून, ‘तारिणी’ला २.५ टीआरपी मिळाला आहे. याउलट प्राइम टाइम नसूनही ६:३० वाजता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, या आठवड्यात सर्व मालिकांमध्ये गणेशोत्सव विशेष भाग सुरू आहेत. त्यामुळे टीआरपीमध्ये काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.