Zee Marathi Serial TRP : ‘झी मराठी’ वाहिनीवर ११ ऑगस्ट रोजी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिकांचं ग्रँड लॉन्चिंग करण्यात आलं. यापैकी ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर, तिच्यासह या मालिकेत सुबोध भावे, पूर्णिमा डे, राज मोरे, किशोरी अंबिये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तेजश्रीचं पुनरागमन असल्याने प्रेक्षकांना या मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहेत. याशिवाय ही मालिका सुरू झाल्यावर टीआरपीच्या आकडेवारीत सुद्धा मोठा बदल होईल अशा चर्चा सुरुवातीपासूनच सर्वत्र रंगल्या होत्या. मात्र, दोन मालिकांच्या लॉन्च नंतरही ‘झी मराठी’च्या टीआरपीत फारसा मोठा बदल झालेला नाही.

तेजश्री प्रधानच्या मालिकेच्या ओपनिंग टीआरपीची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. याशिवाय शिवानी सोनारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तारिणी’ला पहिल्या आठवड्यात कसा प्रतिसाद मिळालाय हे जाणून घेऊयात…

‘झी मराठी’वर नव्याने सुरू झालेली ‘कमळी’ मालिका या आठवड्यात वाहिनीवर ३.३ रेटिंगसह पहिल्या स्थानी आहे. तर या पाठोपाठ दुसऱ्या स्थानवर हर्षदा खानविलकर यांची ‘लक्ष्मी निवास’ मालिका आहे. ही मालिका रात्री ८ ते ९ अशी एक तास प्रसारित केली जाते आणि याच्या दोन्ही स्लॉटचा टीआरपी चांगला आहे.

तेजश्री प्रधानची नव्याने सुरू झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा ओपनिंग TRP २.९ असून, ‘तारिणी’चा टीआरपी २.७ इतका आहे. या दोन्ही मालिकांना पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही मालिका नवीन असल्याने येत्या काळात या आकडेवारीत आणखी वाढ होईल असं म्हटलं जात आहे.

Zee Marathi Serial TRP
झी मराठीच्या मालिकांचा टीआरपी – अभिनेत्री किशोरी अंबियेंची पोस्ट ( Zee Marathi Tejashri Pradhan Serial TRP )

दरम्यान, दोन नव्या मालिका सुरू झाल्यावर वाहिनीने जुन्या ३ मालिकांची वेळ बदलली होती. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला ६:३० च्या नॉन प्राइम स्लॉटला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा टीआरपी २.० इतका आहे. तर ‘पारू’ला २.५ टीआरपी मिळाला आहे.