Kamali Upcoming Twist: सिद्धटेकमध्ये राहणारी कमळी शहरात येऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहते. आईचा विरोध असताना ती जिद्दीने मुंबईत आली आहे. मात्र, मुंबईत आल्यानंतर तिला सतत संकटांचा सामना करावा लागत आहे.

अनिकाला कमळी आवडत नाही. अगदी पहिल्या भेटीपासून त्यांच्यात वैर असल्याचे दिसत आहे. कमळी मुंबईत आल्यापासून ती परत तिच्या गावी जावी यासाठी सतत अनिका प्रयत्न करत आहे.

जेव्हा कमळी व तिची बालमैत्रीण निंगीला अनिकाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, तेव्हापासून तिला कॉलेजमधून बाहेर काढण्याचा अनिकाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ती अनेक कारस्थाने करताना दिसते. या सगळ्यात तिची आई आणि आजी तिला मदत करतात.

अनिका पुन्हा कारस्थान करणार

नुकतीच कबड्डीची स्पर्धा झाली. या स्पर्धेत कमळी व अनिका यांचे संघ एकमेकांच्या विरुद्ध अंतिम सामना खेळळे. कमळी त्या स्पर्धेत पोहोचू नये, म्हणून अनिकाच्या आईने कमळी किडनॅप केले होते. मात्र, तारिनीने तिला मदत केली. कबड्डीच्या स्पर्धेत कमळी पोहोचली आणि तिच्या संघाने तो सामना जिंकला.त्यानंतर अनिकाचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

आता अनिका कमळी व निंगीला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी मोठे कारस्थान करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर कमळी मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत अनिका उभी असलेल्या ठिकाणी जाळ दिसतो, त्यामुळे अनिकाच्या डोळ्यांना इजा होते. अनिका मोठ्याने ओरडते. कमळीसह इतर विद्यार्थी अनिकाकडे धावत जातात.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की कॉलेजचे प्राचार्य त्यांचा निर्णय सांगतात. ते म्हणतात, “आताच्या आता या दोघींना रस्टिकेट करण्यात येत आहे.” त्यानंतर अनिका व तिची आई हसताना दिसत आहे. कमळी निंगीला म्हणते की हे कोणी का केलं असेल? जी चूक आपल्या हातून झालेलीच नाही. त्याची शिक्षा आपण का भोगायची. मी न्याय मिळवल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही.

हा प्रोमो शेअर करताना अन्यायाविरुद्ध लढणार आपली कमळी अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.