Lakhat Ek Aamcha Dada fame actors dance on Sundari song: ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. डॅडींचे सर्व कारस्थान सूर्यासमोर आल्यानंतर त्यांना त्याची शिक्षा मिळावी यासाठी सूर्या आणि संपूर्ण कुटुंब प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेचा शेवट कसा होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
आता मालिका अजून संपली नसली तरी मालिकेचे शूटिंग संपले आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. या मालिकेत सूर्या व त्याच्या चार बहिणींच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळाली. सूर्यादादाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता नितीश चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
‘सुंदरी’ गाण्यावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा डान्स
नितीश चव्हाणने सोशल मीडियावर संजू राठोडच्या सुंदरी या गाण्यावर डान्स केला आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर मालिकेतील त्याचे इतर सहकलाकार दिसत आहेत. शत्रूच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अतुल कुडाळे, भाग्याच्या भूमिकेत दिसणारी जुई तानपुरे व राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजयदेखील दिसत आहेत.
सुंदरी गाण्यावरील त्यांच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, हा डान्स करताना त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना नितीशने इतर कलाकारांना टॅग केले आहे. तसेच, संजू राठोडलादेखील टॅग केले आहे. संजू राठोडने कमेंट करीत ‘ओहो’ असे लिहीत त्यांचे कौतुक केले आहे.

आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स करीत या कलाकारांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “एक नंबर”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अतुलने खूप छान डान्स केला”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “अप्रतिम”, एका नेटकऱ्याने लिहिले, “हावभाव खूप छान” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
मालिका सुरू असतानादेखील हे कलाकार विविध गाण्यांवर सादरीकरण करताना दिसले. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आता या मालिकेनंतर हे कलाकार कोणत्या भूमिकांतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.