Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Twist: सूर्या दादा, त्याच्या चार बहिणी व तुळजा असे हे कुटुंब सर्वांनाच माहीत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील हे जगताप कुटुंब सर्वांचेच लाडके आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्याची आई आशा घरी परतल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत डॅडी म्हणजेच जालिंदर निंबाळकर सूर्या व त्याच्या कुटुंबाविरुद्ध सतत कारस्थान करताना दिसतात. आता पुन्हा एकदा जालिंदर निंबाळकर सूर्याच्या विरुद्ध मोठे कारस्थान करताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.
‘लाखात एक आमचा दादा’मध्ये ट्विस्ट
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, डॅडी म्हणजेच जालिंदर निंबाळकर छत्रीला सांगतो, “छत्री, कामात आम्हाला कसलीच चूक नको आहे. आजच्या आज हे काम मार्गी लागलं पाहिजे.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, काही गुंड सूर्याच्या घरी आले आहेत. घरी सूर्याची आई आणि त्याची लहान बहीण भाग्या आहे. दोघीही घरात असून त्यांनी घराचा दरवाजा लावला आहे. गुंड तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. आशा व भाग्या तो दरवाजा उघडू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतात. यादरम्यान त्या दोघीही रडत असल्याचे दिसत आहे. तसेच सूर्या अशी हाक मारताना दिसत आहेत.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, गुंड तो दरवाजा जबरदस्तीने उघडतात. त्यातील एक जण सूर्याच्या आईला मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र तितक्यात सूर्या येतो. तो त्याला अडवतो. तो त्या गुंडांशी दोन हात करतो. तितक्यात एक गुंड सूर्याच्या बहिणीला छेडतो. ती दादा अशी हाक मारते, सूर्य़ा तिच्याकडे धाव घेत दरवाजाचा पडदा ओढतो व तो भाग्याच्या अंगावर टाकतो. या सगळ्यात एक गुंड धारधार चाकू घेऊन आशाकडे येतो. तो आशाला मारणार तितक्यात सूर्या त्याच्या आडवा येतो. त्याच्या पोटात तो चाकू घुसतो. त्यानंतर आशा व भाग्या मोठ्याने सूर्याचे नाव घेताना दिसतात.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, आई व बहिणीचा जीव वाचवताना सूर्या स्वत:चा जीव गमावणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्याची आई आशा जालिंदरमुळे तुरुंगात होती. मात्र, गावकऱ्यांना तसेच सूर्याच्या कुटुंबाला असे सांगितले गेले की ती पळून गेली आहे. आता आशा परत आल्यानंतर जालिंदर तिला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, जालिंदर निंबाळकरचे सत्य सूर्यासमोर कधी येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.