Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada Serial Off Air : गेल्या सहा महिन्यांत ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘शिवा’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकांनी प्रेक्षकांना निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं. या मालिकांच्या जागी सध्या वाहिनीवर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. आता या पाठोपाठ ‘झी मराठी’वरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामधील मुख्य नायिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून, लवकरच ही मालिका ऑफ एअर होणार आहे. यामध्ये तुळजा हे मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने सोशल मीडियावर खास कविता लिहित प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ८ जुलै २०२४ रोजी ऑन एअर झाली होती. यामध्ये मृण्मयीसह अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारत होता. अवघ्या १४ महिन्यांत ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची वेळ टीआरपीच्या कारणास्तव अनेकदा बदलण्यात आली होती. आता सूर्या-तुळजाची जोडी सर्वांचा निरोप घेणार आहे. मालिकेचं शूटिंग नुकतंच पार पडलं आहे. त्यामुळे कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आहे.
अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने भावुक कविता लिहित घेतला मालिकेचा निरोप
मृण्मयी आणि तुळजाची पडली गाठ,
दोघींमध्ये झाली मैत्री दाट.
मृण्मयी जशी शांत, सौम्य, सोज्ज्वळ,
तुळजा तशी बोल्ड, बिंधास्त पण तेवढीच प्रांजळ.
वज्र प्रोडक्शनमध्ये तुळजा मृण्मयीचा झाला उगम,
तेव्हाच एका नायिकेचा, तिच्या पात्राशी झाला संगम.
मृण्मयी तुळजाने धरून हातात हात,
केला लाखात एक मालिकेचा यशस्वी प्रवास.
मृण्मयीने व्यक्तिरेखेतून तुळजाला दाखवलं,
तुळजाने, हाडाची कलाकार म्हणून मृण्मयीला घडवलं.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तुळजाने शिकवलं
मृण्मयीने तुळजाकडून असं बरंच काही मिळवलं.
मृण्मयीला गवसली तुळजासारखी लाखात एक गुरु,
तिच्याच साथीने चालू राहील मृण्मयीचा यशस्वी प्रवास सुरू.
वज्र प्रोडक्शनचा मिळाला लाख मोलाचा हातभार,
त्यासाठी मृण्मयी व तुळजाकडून त्यांचे लाख लाख आभारHeartist Heartist Thankyou
दरम्यान, मृण्मयीच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला भविष्यात येणाऱ्या पुढील प्रोजेक्टसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.