Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नुकताच भावनाच्या गळ्यात सिद्धूने गुपचूप मंगळसूत्र घातल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळाला. सिद्धूचं भावनावर मनापासून प्रेम असतं. त्यामुळे लवकरात लवकर भावनासमोर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करायचं असं सिद्धूने ठरवलेलं असतं. मात्र, आईच्या दबावामुळे सिद्धूला इच्छा नसूनही पूर्वीशी साखरपुडा करावा लागतो.
पूर्वीशी साखरपुडा झालेला असला तरीही सिद्धूच्या मनातील भावनाविषयीचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाहीये. क्षणोक्षणी तो घरच्यांसमोर भावनाची बाजू घेत असतो. याशिवाय देवीच्या उत्सवात त्याला भावनावर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. काही करून भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं असं तो ठरवतो. सुरुवातीला लक्ष्मी आणि जान्हवी या दोघींसमोर आपलं मन मोकळं करुयात असा विचार सिद्धूच्या मनात येतो. पण, तो कोणालाही काहीच सांगत नाही.
भावना देवीआईचा जप करत असताना सिद्धू मागून येऊन गुपचूप तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. थोड्यावेळाने, जेव्हा भावनाला गळ्यातील मंगळसूत्र दिसतं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसतो. ती एकटी बाजूला जाऊन रडू लागते. हे मंगळसूत्र नेमकं कोणी घातलंय याचा विचार करू लागते. या मंगळसूत्राबद्दल जेव्हा लक्ष्मीला कळेल तेव्हा तिलाही धक्का बसणार आहे. मात्र, या सगळ्यात पूर्वी देखील सिद्धूच्या पडलेली आहे. ती गाडेपाटलांच्या घरी जाते तेव्हा गुरूजी वेगळाच खुलासा करणार आहेत.
गाडेपाटलांच्या घरी गुरूजी येतात आणि सांगतात, “तुमच्या धाकट्या सुनेसाठी मी गंडा ( धागा ) आणलेला आहे.” पण, जेव्हा पूर्वी गुरूजींसमोर तो गंडा हातात बांधून घेण्यासाठी बसते तेव्हा गुरूजी म्हणतात, “ही तुमच्या घरची नवीन सून नाही.” हे ऐकून प्रत्येकालाच धक्का बसतो. पूर्वीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो पण, दुसरीकडे सिद्धू खूपच आनंदी असतो.
यानंतर, गुरुजी ‘लक्ष्मी निवास’मध्ये जाऊन तो धागा भावनाच्या हातात बांधतात आणि तिला आशीर्वाद देतात. याशिवाय ते सिद्धूची वैयक्तिक भेट घेऊन मंगळसूत्राचं सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर कबूल कर असा सल्ला त्याला देतात.
आता मंगळसूत्राचं सत्य समोर आल्यावर गाडेपाटील भावनाचा सून म्हणून स्वीकार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, आता काहीही झालं तरी भावनाच सिद्धूची पत्नी होणार आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग १ आणि २ मे रोजी रात्री आठ ते नऊ या वेळेत ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.