Lakshmi Niwas upcoming twist: स्वभाव, पेहराव, बोलण्याची पद्धत यांमुळे मालिकेतील कलाकारांची ओळख निर्माण होते. आता ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील कलाकारांचीदेखील एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
विनम्र, प्रेमळ म्हणून भावनाची ओळख आहे; तर सिद्धू तितकाच खोडकर, स्वत:च्या मनाचे ऐकणारा, त्याच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असणारा असा आहे. जान्हवीदेखील तिच्या ताईप्रमाणेच प्रेमळ, सगळ्यांचा विचार करणारी आहे आणि जयंतवर मनापासून प्रेम करणारी आहे. जयंतदेखील जान्हवीवर प्रचंड प्रेम करतो; पण अनेकदा तो अतिरेक करतो. जान्हवीने त्याच्यापेक्षा इतर कोणाकडे लक्ष दिले, तर त्याला ते आवडत नाही. म्हणूनच जयंतला अनेकदा प्रेक्षक विचित्र, विकृत म्हणतात. या मालिकेतील हरीश व संतोष पैशांसाठी काहीही करायला तयार असल्याचे दिसते.
त्याबरोबरच मालिकेतील श्रीनिवास व लक्ष्मी हे साधी राहणी आणि उत्तम विचारसरणी अशा व्यक्तिमत्त्वाचे आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील हे जोडपे त्यांचे कुटुंब कायम एकत्र, प्रेमाने राहावे यासाठी कष्ट घेताना दिसते. ते कष्टांबरोबरच सर्वांची मनेदेखील सांभाळता; पण कोणाचे काही चुकले, तर कडक शब्दांत त्यांची कानउघाडणीदेखील करतात. आता मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास एका वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे.
झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास या मालिकेचा एक प्रोमो नुकताच शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की हरिश आणि संतोष त्यांच्या आई-वडिलांना म्हणजेच श्रीनिवास व लक्ष्मी यांना आवाज देत आहेत. आई-बाबा, असे म्हणत ते त्यांच्या खोलीच्या दरवाजा वाजवत आहेत. संतोष म्हणतो की, मी तुमच्यासाठी अंघोळीचं गरम पाणी आणलेलं आहे. तर हरीश म्हणतो की मी सिंचनाच्या नवीन साड्या तुझ्यासाठी आणल्या आहेत. त्यानंतर त्यांना दिसते की, दरवाजाला बाहेरून कडी आहे.
लक्ष्मीची होणार कडकलक्ष्मी
प्रोमोमध्ये ऐकायले मिळते की, श्रीनिवासच्या पीएफ(PF)मुळे मुलांच्या प्रेमाला उधाण येणार. हरीश संतोषला म्हणतो की आई-बाबा कुठे गेले असतील रे? त्यावर संतोष म्हणतो की, पळून गेले असतील. तितक्यात श्रीनिवास व लक्ष्मीची एन्ट्री होते. श्रीनिवास मोठ्या आवाजात म्हणतो, “संतोष आम्ही पळणार नाही.” पुढे लक्ष्मी म्हणते, “तुम्हाला पळवणार.” लक्ष्मी व श्रीनिवासचा बदललेला पेहराव आणि रौद्र रूप पाहून हरीश व संतोष यांना धक्का बसल्याचे दिसत आहे. प्रोमोच्या शेवटी लक्ष्मी ‘कळलं की नाही?’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मुलांची पळता भुई थोडी झाली, आली ‘कडकलक्ष्मी’ आली”, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत लक्ष्मी-श्रीनिवासच्या नवीन अवताराचे मोठे कौतुक केले आहे. “आता मजा येणार”, “हा कडकलक्ष्मीचा अवतार त्या सिद्धूच्या आजीलासुद्धा दाखवा”, “वाह! काहीतरी नवीन बघायला मिळणार”, “आवडलं”, “आता मजा येणार. हर्षदामॅडम तुम्ही कडकलक्ष्मीच शोभता”, “ताई तुम्हाला हीच भूमिका शोभते”, “त्यांच्या अशा भूमिका मला खूप आवडतात” अशा कमेंट्स करीत प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.





तर काहींना हर्षदा खानविलकर यांनी आधीच्या मालिकेत साकारलेल्या भूमिकांची आठवण आल्याचे कमेंट्समधून दिसत आहे. “सौंदर्या इनामदार परत आल्या”, “अक्कासाहेब सरदेशमुख”, “आक्कासाहेब परत आल्या”, “आक्कासाहेब”, “अरे देवा परत एकदा ते ‘कळलं’ ऐकून मला अक्कासाहेबांची आठवण आली”, अशा कमेंट्स करत हर्षदा खानविलकर यांचे कौतुक केले आहे.
हर्षदा खानविलकर यांनी याआधी रंग माझा वेगळा या मालिकेत सौंदर्या ही भूमिका साकारली होती. तर पुढचं पाऊल या मालिकेत आक्कासाहेब ही भूमिका साकारली होती. या दोन्ही मालिकांतील त्यांच्या भूमिका मोठ्या प्रमाणात गाजल्या होत्या. आता लक्ष्मी निवास या मालिकेतून त्यांनी आधीपेक्षा वेगळी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे.