Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सध्या नवीन वळण आले आहे. जान्हवीने जयंतच्या विचित्र वागण्याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळाले.

गोव्याला फिरायला गेल्यानंतर तिने तिथे जयंतच्या समोरच समुद्रात उडी मारली. त्याआधी तिने जयंतला खुर्चीबरोबर दोरीने बांधले होते. त्यामुळे त्याला काहीही करता आले नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा लक्ष्मी-श्रीनिवासचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. तेव्हा ते जान्हवी व जयंतची वाट पाहत होते.

जेव्हा जयंत आला आणि त्याने सांगितले की, जान्हवी सर्वांना सोडून गेली आहे, तेव्हा घरातील सर्वांना धक्का बसला. तर लक्ष्मीला जयंतच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. जान्हवी व जयंत त्यांना फसवत आहेत, मजा करीत आहेत. त्यामुळे ती तुम्ही रडू नका, असे इतरांना सांगत राहिली. जान्हवी कोणत्याही क्षणी घरी येईल, असा विश्वास तिला वाटत राहिला. पोलिसांनी जेव्हा जान्हवीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने शोध बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले, तेव्हाही जान्हवीचा मृत्यू झाला आहे, यावर विश्वास ठेवण्यासाठी लक्ष्मी तयार झाली नाही.

जान्हवी सोडून गेल्याचे सत्य लक्ष्मी स्वीकारणार का?

आता लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोममध्ये पाहायला मिळते की, लक्ष्मी आतील खोलीतून बाहेर येते, तर तिला जान्हवीच्या फोटोला हार घातलेला दिसतो. ते पाहून ती स्वत:शीच म्हणते, “जानूच्या फोटोला असा हार कोणी घातला?”, असे म्हणत ती जान्हवीच्या फोटोचा हार काढण्यासाठी पुढे येते. तितक्यात जयंत पुढे येतो आणि म्हणतो की मी हार घातला. कारण- आई जानू या जगात नाही, हे आपल्याला स्वीकारावंच लागेल.” त्यावर लक्ष्मी मला हे मान्य नाही, असे म्हणते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, श्रीनिवास लक्ष्मीला समजावून सांगतो की, आपली जानू सोडून गेली आहे आणि हेच सत्य आहे. त्यानंतर लक्ष्मी घराबाहेर पडते. बादलीतील पाणी स्वत:च्या अंगावर ओतून घेते. त्यानंतर ती जानू, असे म्हणत मोठ्याने ओरडते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘जान्हवी सोडून गेल्याचं सत्य स्वीकारू शकेल का लक्ष्मी?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जयंतने त्याच्या वागण्याला कंटाळून जान्हवीने टोकाचे पाऊल उचलल्याचे सत्य सांगितले नाही. आता त्याचे हे सत्य कधी समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकतादेखील प्रेक्षकांना लागलेली आहे.