Zee Marathi Navri Mile Hitlerla Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. आता कोणत्याही वाहिनीवर नव्या मालिका सुरू झाल्यावर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशीच एक प्रेक्षकांची आवडली मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्यावर्षी मार्च महिन्यात ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची फ्रेश जोडी झळकली. या दोघांनी अनुक्रमे एजे आणि लीला यांच्या भूमिका साकारल्या. अवघ्या काही दिवसांतच ही मालिका घराघरांत लोकप्रिय झाली. रात्री उशिरा प्रसारित होऊनही या मालिकेचा टीआरपी खूप चांगला होता.

एवढंच नव्हे तर, गेल्यावर्षी पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात देखील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, जवळपास १४ महिने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर ही मालिका आता सर्वांचा निरोप घेणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर यासंदर्भात भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.

मालिकेत किशोरची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद लिमये म्हणतो, “एक सुंदर प्रवास संपला…नवरी मिळे हिटलरला” तर, मुख्य अभिनेत्री वल्लरीने ‘लास्ट डे ऑफ शूट’ असं कॅप्शन देत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. तसेच सध्याच्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत असंही वल्लरीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत जहागीरदार कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यामुळेच शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार सेटवरच्या जहागीरदार बंगल्याची झलक दाखवत लिहितात, “जहागीरदारांचा बंगला… नेहमी माणसांनी हसत-खेळत वातावरण असायचं. माहिती नाही इथली माणसं उद्यापासून कुठे असतील पण, जिथे कुठे असतील फक्त प्रेम देत असतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
navri mile hitlerla off air
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होणार

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये वल्लरी आणि राकेश बापट यांच्यासह माधुरी भारती, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर, भूमिजा पाटील, भारती पाटील, प्रसाद लिमये अशा कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.