‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सध्या सूर्या दादा विरुद्ध डॅडी म्हणजेच जालिंदर असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्याशी चांगलं वागण्याचं नाटक करून त्याला उद्धवस्थ करायचं असा क्रूर प्लॅन जालिंदरचा असतो. खरंतर, सूर्याची बायको तुळजा ही जालिंदरची मुलगी असते. स्वत:च्या मुलीचा संसार, तिचा नवरा या सगळ्याकडे दुर्लक्ष करून जालिंदर फक्त सूर्या व त्याच्या कुटुंबीयांना छळण्यासाठी नवनवीन योजना आखत असतो.
जालिंदरने गोड बोलून सूर्याची जमीन सुद्धा त्याच्याकडून हडप केलेली असते. आता या दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होणार आहे. यावेळी कोर्टात जालिंदर सूर्याला धमकी देतो. “आम्हाला खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येतं, त्यामुळे आम्हाला कोणीही मात देऊ शकत नाही” असं जालिंदर ठामपणे सूर्याला सांगत असते. इतक्यात मागून एका वकील बाईंची एन्ट्री होते. सूर्या दादाला या जालिंदरविरुद्धच्या केसमध्ये त्या मदत करणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
सूर्या दादाच्या मदतीसाठी मालिकेत एक नवीन एन्ट्री झालेली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे मधुगंधा कुलकर्णी. प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये तिने काम केलेलं आहे. मात्र, मधुगंधा प्रसिद्ध लेखिका म्हणून देखील ओळखली जाते. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकांचं तिने पटकथा लेखन केलं आहे. आता मधुगंधा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत वकिलाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत मधुगंधा कुलकर्णी वकील कालिंदी धर्माधिकारी ही भूमिका साकारत आहे. एन्ट्री घेताच तिचा रुबाबदार अंदाज पाहयला मिळतो. तिला पाहून जालिंदरची सुद्धा बोबडी वळते. “सुरुवात तू केलीस… आता शेवट तुला फासावर लटकवूनच होईल” असं कालिंदी धर्माधिकारी जालिंदरचा ठणकावून सांगते.
दरम्यान, कालिंदीच्या एन्ट्रीचा हा विशेष भाग १ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजता प्रसारित केला जाणार आहे.