Zee Marathi New Serial : छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेची घोषणा केली. तेजश्रीचं पुनरागमन असल्याने प्रेक्षक या मालिकेच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या पाठोपाठ सर्वांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर एका लोकप्रिय अभिनेत्रीची लवकरच एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री बहुप्रतीक्षित ‘जगद्धात्री’ मालिकेत झळकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीने ‘जगध्दात्री’ या मालिकेची घोषणा केली होती. पण, यानंतर काही कारणास्तव या मालिकेच्या प्रदर्शनासाठी विलंब झाला. शेवटी आता दीड वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं बोललं जात आहे.
‘झी मराठी’च्या या नव्या मालिकेत स्टार अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार आहे. आता तेजश्री पाठोपाठ ‘राजा राणीची गं जोडी’ फेम शिवानी ‘झी मराठी’वर झळकण्यासाठी सज्ज होणार आहे. वाहिनीने तिच्या एन्ट्रीचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, यात शिवानीचा चेहरा लपवण्यात आला आहे. पण, तिच्या चाहत्यांनी तिला अचूक ओळखलं आहे.
“ती येतेय जिच्यामुळे सगळं काही आहे… गुरू पौर्णिमेच्या शुभदिनी घेऊन येतोय नव्या मालिकेचा प्रोमो” असं कॅप्शन देत हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो आज ( १० जुलै ) रात्री ८ वाजून २० मिनिटांनी शेअर करण्यात येणार आहे. आता या नव्या मालिकेबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्येच ही अभिनेत्री शिवानी सोनार असल्याचं ओळखलं आहे. याशिवाय नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री नियती राजवाडे देखील झळकणार आहे. तब्बल २५ वर्षांनंतर नियती वाहिनीवर पुनरागमन करणार आहे.