Zee Marathi New Serial Tarini : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘कमळी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या दोन मालिकांपाठोपाठ आता नुकताच एका जबरदस्त मालिकेचा प्रोमो वाहिनीने लॉन्च केला आहे. या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिका साकारणार आहे.
‘झी मराठी’च्या नव्याकोऱ्या ‘तारिणी’ या मालिकेत शिवानी सोनार आणि अभिज्ञा भावे एकत्र झळकणार आहेत. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ‘तारिणी’ची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
घरातील बहुतांश मंडळी तारिणीचा राग-राग करत असतात. पण, ती खचून न जाता सर्वांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करत असते. तारिणी स्पेशल क्राइम युनिट ऑफिसर असते. कुटुंबासह ती या मालिकेत सामाजिक जबाबदारीही निभावताना दिसेल. शिवानी सोनारचा सोज्वळ, मोहक आणि दुष्टांचा संहार करताना तेवढाच रुबाबदार अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
शिवानीसह या मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका साकारतोय अभिनेता स्वराज नागरगोजे. यापूर्वी या अभिनेत्याने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘लेक असावी तर अशी’ या सिनेमात सुद्धा तो झळकला आहे. ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या सिनेमात देखील त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता स्वराज या नव्या ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. त्याने या सिरियलमध्ये ‘केदार’ ही भूमिका साकारली आहे.
शिवानी सोनार, स्वराज नागरगोजे, अभिज्ञा भावे यांच्यासह या मालिकेत सुवेधा देसाई, आरती वडगबाळकर, नियती राजवाडे, रुपाली मांगले, निकिता झेपाले, अंजली कदम, पंकज चेंबूरकर, ज्येष्ठ अभिनेत्री रागिणी सामंत असे बरेच कलाकार झळकणार आहेत.
दरम्यान, शिवानीची मालिका किती तारखेपासून आणि किती वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीकडून मालिकेच्या लॉन्च डेटबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल. सध्या संपूर्ण कलाविश्वातून शिवानी, अभिज्ञा आणि मालिकेच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.