Nirmiti Sawant Enters In Zee Marathi’s Serial : मराठी नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निर्मिती सावंत यांना ओळखलं जातं. ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘झिम्मा २’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केल्यावर आता या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
‘कुमारी गंगुबाई नॉन-मॅट्रिक’ या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळे यांची अफलातून जोडी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. ‘फू बाई फू’, ‘जाडूबाई जोरात’, ‘१७६० सासूबाई’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता मोठ्या ब्रेकनंतर निर्मिती सावंत पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतल्या आहेत.
नऊवारी साडी, नाकात नथ, केसात गजरा, कपाळावर मोठं कुंकू, भरपूर दागिने अशा डॅशिंग अंदाजात अभिनेत्रीने ‘झी मराठी’ वाहिनीच्या मालिकेत एन्ट्री घेतली आहे. निर्मिती सावंत नेमक्या कोणत्या मालिकेत येणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. पण, समोर आलेल्या प्रोमोनुसार अभिनेत्री ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या महासंगमच्या विशेष भागांमध्ये एन्ट्री घेणार आहेत.
‘झी मराठी’वर प्रेक्षकांना लवकरच ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम पाहायला मिळेल. याचवेळी अहिल्यादेवी आणि लक्ष्मीच्या आयुष्यात पद्मावतीची एन्ट्री घेईल. कोल्हापुरच्या रुबाबदार पद्मावतीच्या भूमिकेत अभिनेत्री निर्मिती सावंत झळकणार आहेत. या प्रोमोमध्ये त्यांनी अहिल्या आणि लक्ष्मीला एक चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळत आहे. आता त्या अहिल्या आणि लक्ष्मीच्या नेमक्या कोण आहेत, या तिघींचं एकमेकींशी असलेलं नातं काय आहे याचा उलगडा लवकरच मालिकांच्या महासंगममध्ये होईल.
दरम्यान, ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन्ही मालिकांचा हा महासंगम येत्या २७ जुलैपासून ७:३० वाजता सुरू होईल. निर्मिती सावंत यांच्या एन्ट्रीने चाहते प्रचंड खूश झाले आहेत. आता पद्मावती आल्यावर महासंगममध्ये काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.