Paaru Upcoming Twist: ‘पारू’ या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून आदित्य व साजिरीच्या लग्नाची गडबड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करने आदित्यसाठी साजिरीला पसंत केले आहे.

या सगळ्यात आदित्य, पारू, मारुती, प्रीतम, श्रीकांत, प्रिया हे सर्वजण या लग्नामुळे आनंदी नाहीत, कारण पारू व आदित्यचे आधीच लग्न झाले आहे हे सत्य फक्त त्यांनाच माहीत आहे. आदित्य व पारूचे एकमेकांवर प्रेम आहे, पण याबाबत त्यापैकी कोणीही काहीही अहिल्यादेवीला सांगितलेले नाही.

आदित्य व पारू दोघेही अहिल्यादेवीचा आदर करतात, त्यांचे तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे त्यांना तिला दुखवायचे नाही. या कारणामुळेच जेव्हा आदित्यने पारूला पळून जाण्याविषयी विचारले, तेव्हा तिने साफ नकार दिला. त्यामुळे आता साजिरी व आदित्यचे लग्न होणार का, तसे झाले तर आदित्य व पारूच्या लव्ह स्टोरीचे पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न पडले होते.

पारू मालिकेत ट्विस्ट

आता मात्र आदित्य व पारू एक मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, पारु व आदित्य एका मंदिरात आहेत. देवाचे आशीर्वाद घेतल्यानंतर आदित्य पारुला म्हणतो, “पारु आता बास झालं, आईपासून आपल्या लग्नाचं मी अजून लपवू शकणार नाही.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अहिल्यादेवीच्या घरासमोर एक जोगतीण येते. ती म्हणते, आंबाबाईचा उदो उदो… काळाचं चक्र आता पूर्ण होणार आहे. तुझ्या लेकाच्या लग्नाचा कौल देवी देणार आहे. तुझी परीक्षेची वेळ आली, योग्य निर्णय तुला घ्यावा लागणार आहे, असे म्हणत ती अहिल्याच्या कपाळावर भंडारा लावते; त्यानंतर अहिल्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “वेळ आली परीक्षेची, आदित्य-पारुचं सत्य अहिल्यासमोर येण्याची”, अशी कॅप्शन दिली आहे.

आता आदित्य व पारू त्यांच्या लग्नाचं सत्य अहिल्यादेवीला कसं सांगणार, अहिल्यादेवी आदित्य व पारूचं लग्न स्वीकारणार का की ती दुखावली जाणार, ती नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.