Zee Marathi : मराठी वाहिन्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यात येत आहे. काही मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत, अनेक मालिकांमध्ये लोकप्रिय कलाकारांची एन्ट्री झालेली आहे तर, काही मालिका येत्या काही दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

‘झी मराठी’वर सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये काही नवीन मालिका सुरू झाल्या असून, येत्या काळात आणखी काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहिनीवरील जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षी १८ मार्चला एक नवीन मालिका सुरू करण्यात आली होती. या मालिकेचं नाव आहे ‘पुन्हा कर्तव्य आहे’. या मालिकेचा विषय सुद्धा काहीसा वेगळा होता. अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची फ्रेश जोडी या मालिकेत पाहायला मिळाली होती. यामध्ये या दोघांनी अनुक्रमे वसुंधरा आणि आकाश या भूमिका साकारल्या. या दोघांची आधीच लग्न झालेली असतात पण, मुलांचा सांभाळ करण्यासाठी वसुंधरा आणि आकाश एकत्र येऊन नवीन सुरुवात करतात. याकाळात दोघांमध्ये येणारे अडथळे, वसुंधराच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याची एन्ट्री असे अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाले. पण, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आला. यानंतर मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षयाने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेच्या सेटवरील देवघराचा फोटो शेअर करत अक्षया हिंदळकर लिहिते, “आज पाऊल निघत नव्हतं. चला निरोप घेते…मला या क्षणाला काय वाटतंय हे मी खरंच शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण या प्रवासात खूप चांगली माणसं भेटली. अनेक आठवणी माझ्याबरोबर घेऊन मी चालले आहे. खूप प्रेम.” मालिका बंद होणार असल्याने ‘पुन्हा कर्तव्य आहे’च्या सेटवर देखील काहीसं भावनिक वातावरण पाहायला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
zee marathi serial going off air
अभिनेत्री अक्षया हिंदळकरची पोस्ट

दरम्यान, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत प्रेक्षकांना दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. वंदना सरदेसाई, मृणाल देशपांडे, सिद्धेश प्रभाकर, सुदेश म्हाशीलकर, वंदना गुप्ते या कलाकारांनी देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’च्या जागी सायंकाळी ६ वाजता कोणती मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.