Savalyachi Janu Savali Promo: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सारंग व सावली प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. सारंग व सावलीमधील मैत्री प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. अशातच मालिकेतील ट्विस्ट त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार, ही उत्सुकता टिकवून ठेवत आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सावलीने सारंगला त्रास होऊ नये म्हणून मेहंदळेंचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडताना तिने सारंगसाठी एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये भैरवीने सांगितल्यामुळे ती सारंगशी बोलत नसल्याचे लिहिले होते. तसेच सारंगला तिच्यामुळे त्रास होतो, म्हणून ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे, असे तिने पत्रात लिहिले होते. मात्र, ऐश्वर्याने ते पत्र बदलले व कुटुंबासमोर एक खोटे पत्र वाचले, ज्यामध्ये सावलीने जगन्नाथबरोबर मिळून कट कारस्थान केल्याचा गुन्हा मान्य केला होता.
दुसरीकडे कोणालाही न सांगता घराबाहेर पडलेल्या सावलीला एक ट्रक धडक देतो. त्याचा ड्रायव्हर तिचा मृत्यू झाला आहे, असे समजून तिला नदीपात्रात फेकून देतो. सावली एका किनाऱ्याजवळ येऊन पोहोचते. एक जोडपे तिला घरी आणते आणि तिच्यावर उपचार केले जातात. सावली बरी होते. सारंगला सावलीने लिहिलेले खरे पत्र सापडते. तो सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडतो. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तो सावलीला घरी परत घेऊन आल्याचे दिसत आहे.
भैरवी तिच्या चुकांसाठी सावलीची माफी मागणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भैरवी व तारा सारंगच्या घरी आल्या आहेत. त्याचवेळी सारंग म्हणतो, “भैरवीजींनी सगळ्यांसमोर सावलीची माफी मागावी”, सारंगचे बोलणे ऐकून त्याच्या आईला म्हणजेच तिलोत्तमाला धक्का बसतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, भैरवी सावलीची माफी मागत आहे. भैरवी म्हणते, “सावली, मी जे काही आजवर तुझ्याशी चुकीचं वागले असेल तर त्यासाठी तुझी भैरवी माई तुझी माफी मागत आहे.” माफी मागताना भैरवी रडताना दिसत आहे. तसेच ती सावलीचे पायदेखील धरण्याचा प्रयत्न करते. मात्र, तसे करण्यापासून सावली तिला अडवते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावलीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ शकेल का सारंग?”, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, सावली व सारंगचे नाते पुढे कसे असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.