Zee Marathi Savlyachi Janu Savali Serial New Actress Entry : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेता साईंकित कामत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मंगळागौरीच्या कार्यक्रमाला सावलीने अमृतावर दादागिरी करणाऱ्या ताराला चांगलाच धडा शिकवला होता.
आता या मालिकेतील खलनायिकांना धडा शिकवण्यासाठी आणखी एका लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीची मेहेंदळेंच्या कुटुंबात एन्ट्री होणार आहे. या अभिनेत्री नेमक्या कोण आहेत? जाणून घेऊयात…
विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘शिवा’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘शिवा’ मालिका संपल्यावर सविता मालपेकरांची लगेच ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत एन्ट्री झालेली आहे.
मेहेंदळेच्या कुटुंबात एन्ट्री घेतल्यावर त्या सर्वप्रथम प्रत्येकाला त्यांच्या पाया पडायला लावतात. त्यांच्या रुबाबदार आवाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. आत्याबाईंना आलेलं पाहून ऐश्वर्याचा चेहरा पडतो. त्या पुढे म्हणतात, “आता सगळ्यांना मी सुतासारखी सरळ करते नाही बघा… मला काय म्हणतात माहितीये ना जगदंबा” यावरून सविता मालपेकर साकारत असलेल्या भूमिकेचं नाव जगदंबा ( आत्या ) असल्याचं स्पष्ट होत आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आता सगळ्यात आधी ऐश्वर्याला सरळ करा”, “जबरदस्त… आत्याबाईंचं मन सावली नक्की जिंकणार”, “ऐश्वर्या आणि ताराच्या मागे लागा चांगलं सरळ करा”, “आमची बाई आजी रॉक्स” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोवर दिल्या आहेत.
सविता मालपेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांडू’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. आता ‘शिवा’ मालिका संपल्यावर त्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ११ ऑगस्टपासून नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.