‘शिवा’ मालिकेत येत्या काही दिवसांत नवनवीन ट्विस्ट येणार आहेत. नामांकित कंपनीच्या सीईओकडून येणाऱ्या दबावामुळे आशूवर प्रचंड मानसिक ताण असतो. तो कामात इतका गुंतून जातो की त्याला वैयक्तिक आयुष्याला वेळ देणं अशक्य होतं. तर, शिवाने देखील रात्रशाळेत ( नाईट स्कूल ) प्रवेश घेऊन शिक्षणाला प्राधान्य दिल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.

आशू आणि शिवा आपआपल्या कामांमध्ये व्यग्र असल्याने त्यांची एकमेकांशी नीट भेटही होत नाहीये. यामुळेच त्या दोघांच्या नात्यात हळुहळू दुरावा येऊ लागला आहे.

आता शिवा लवकरच मालिकेत एका गंभीर सामाजिक मुद्द्यावर आवाज उठवणार आहे. विद्यार्थ्यांच्या आणि एका शिक्षकाच्या मदतीने स्थानिक नगरसेवकाने केलेला भ्रष्टाचाराचा कारभार सर्वांसमोर उघड करायचा असं शिवा ठरवते. हे सगळं शिवा अत्यंत नाट्यमय पद्धतीने प्लॅन करते. ज्यामुळे परिसरात मोठा संघर्ष उफाळून येतो. शिवाला तपासात मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून शांताबाई यांना पाटील कुटुंबाच्या घरी आणलं जातं. त्यांचं औपचारिक स्वागत केलं जातं.

मात्र, काही दिवसांतच सिताईला त्यांच्या वागणुकीबाबत संशय निर्माण होतो. शांताबाईंचं विचित्र वागणं, त्यांना आलेलं मानसिक अस्थैर्य यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होते.

दुसरीकडे, चंदनच्या आयुष्यात एका नव्या मुलीचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे दिव्याच्या मनातील भीती वाढते आणि ती चंदनला जाब विचारते. यामुळे त्यांच्या नात्यात अंतर आणि संशय वाढू लागतो. रॉकी आपल्या UPSC परीक्षेच्या अंतिम फेरीची तयारी करत आहे. त्याचवेळी रॉकी आणि संपदाच्या साखरपुडा व लग्नाविषयी घरात चर्चा सुरु होते, ज्यामुळे देसाई कुटुंबात आनंदाचं आणि उत्साही वातावरण सध्या निर्माण झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या साऱ्या घडामोडी तुम्हाला ‘शिवा’ मालिकेच्या येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहेत आणि याचबरोबर मालिकेत अजून काय नवं वळण उलगडणार, याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. ‘शिवा’ ही मालिका दररोज रात्री ९ वाजता फक्त ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.