Zee Marathi Serial Off Air : सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी चढाओढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात विविध वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. त्यामुळे काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. या मालिका नेमक्या कोणत्या असतील जाणून घेऊयात…
‘झी मराठी’वर येत्या ११ ऑगस्टपासून तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि शिवानी सोनारची प्रमुख भूमिका असलेली ‘तारिणी’ या दोन नव्याकोऱ्या मालिका सुरू होणार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ७:३० च्या स्लॉटला प्रसारित केली जाईल. तर, ‘तारिणी’ मालिका ९:३० ला ऑन एअर होणार आहे. या दोन नवीन मालिका सुरू होणार असल्याने सध्या सुरू असलेल्या मालिकांपैकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार जाणून घेऊयात…
‘या’ मालिका बंद होण्याची शक्यता
‘तारिणी’ ही नवीन मालिका ९:३० ला प्रसारित केली जाईल. सध्या या स्लॉटला ‘शिवा’ मालिका सुरू आहे. त्यामुळे लवकरच ‘शिवा’ सर्वांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिकने मालिका बंद होणार असल्याची हिंट चाहत्यांना इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत दिली आहे.
‘शिवा’ मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी फॅन पेजेसच्या विनंतीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये “मालिका प्लीज बंद करू नका” अशी विनंती चाहत्यांकडून करण्यात येत आहे. याशिवाय पूर्वा कौशिकने सेटवरचा व्हिडीओ शेअर करत त्याला “हे आनंदी आवाज मी कायम मिस करेन” असं कॅप्शन दिलं आहे. यावरून मालिका लवकरच ऑफ एअर होईल असं स्पष्ट होत आहे.
तर, ‘झी मराठी’ वाहिनीवरून ऑफ एअर होण्याची शक्यता असलेली दुसरी मालिका आहे ‘लाखात एक आमचा दादा’. सध्या ही मालिका ६:३० वाजता प्रसारित केली जाते. ११ ऑगस्टपासून या स्लॉटला ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ ही सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये वर्तवली आहे.
पण, नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका संपणार नसून ६ वाजता प्रसारित केली जाणार आहे.

दरम्यान, ‘शिवा’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ या दोन मालिका ऑफ एअर होण्याच्या चर्चा रंगल्यावर याच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त केली आहे.