Zee Marathi Serial Off Air : टीआरपीच्या दृष्टीकोनातून सध्या छोट्या पडद्यावर विविध बदल केले जात आहेत. येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यावेळी नव्या मालिकांची घोषणा केली जाते, त्यावेळी जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे निश्चित असतं. ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे वाहिनीने काही मालिकांच्या वेळेत बदल केला आहे. तर, एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्वा कौशिकची प्रमुख भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. याशिवाय ‘शिवा’चा हटके लूक या मालिकेचा चर्चेचा विषय ठरला होता. या मालिकेतील भूमिकेसाठी पूर्वाला गेल्यावर्षी ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार देखील मिळाला होता. आता ‘तारिणी’ ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने ‘शिवा’ मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.

पूर्वा कौशिकने सेटवरच्या अखेरच्या दिवसाचे शूटिंगचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘शिवा’ची भूमिका साकारताना सुरुवातीला पूर्वाने भूमिकेच्या स्टाइलप्रमाणे तिचे केस कापले होते. यानंतर अलीकडच्या काही भागांमध्ये अभिनेत्री केसांचा विग वापरायची. मालिकेचं शूटिंग संपल्यावर पूर्वाने चाहत्यांना सेटवरची झलक दाखवली, त्यानंतर केसांचा विग काढला…यावेळी तिचे डोळेही पाणावले होते. अशा पद्धतीने अभिनेत्रीने प्रेक्षकांना मालिकेचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं.

“शेवटचा दिवस…शिवाच्या भूमिकेतून मी तुमचा निरोप घेतेय” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. शिवा मालिकेचा शेवटचा भाग ८ ऑगस्टला प्रसारित होणार आहे.

दरम्यान, ‘शिवा’मध्ये पूर्वा कौशिकसह शाल्व किंजवडेकर, मानसी म्हात्रे, अनुपमा ताकमोघे, अंगद म्हसकर, सविता मालपेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आता ‘झी मराठी’वर येत्या ११ ऑगस्टपासून शिवानी सोनारची ‘तारिणी’ मालिका ९:३० वाजता प्रसारित केली जाईल.