Shiva Serial Last Episode : जवळपास दीड वर्षे ‘झी मराठी’ वाहिनीवर अधिराज्य गाजवणारी ‘शिवा’ मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अलीकडेच यामधील काही कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडल्याचं जाहीर केलं होतं. आता ‘शिवा’ मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीकडून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

‘शिवा’ मालिका सर्वांचा निरोप घेताना अखेर सुहासचं खरं रूप अखेर सर्वांसमोर उघड होणार आहे. पण, यासाठी शिवाला मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. सुहास शिवाला उद्धवस्थ करण्यासाठी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांवर एकत्र हल्ला करतो. जेणेकरून कोणाच्या मदतीसाठी जायचं हा विचार करून शिवाची कोंडी होईल. कपटी सुहासने शिवाच्या घरी बॉम्ब ठेवलेला असतो. तो तिला म्हणतो, “तुझ्यासमोर फक्त दोन पर्याय आहेत. एकतर माहेरच्यांना वाचवायचं किंवा सासरच्या लोकांना…आता काय करशील?”

शिवा त्याला सडेतोड उत्तर देत सांगते, “आज तुला कळेल बाईच्या मनगटात किती ताकद असते. कारण, आज मी एकटी नाहीये. माझ्या मदतीला स्पेशल क्राइम युनिट ऑफिसर तारिणी येतेय.” तारिणी म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार. ती ‘शिवा’ मालिकेच्या अखेरच्या भागात खास एन्ट्री घेणार आहे. सुहासला धडा शिकवण्यासाठी ‘तारिणी’ शिवाला खंबीरपणे साथ देणार आहे.

शिवाला पाठिंबा देत तारिणी म्हणते, “तुझ्या कुटुंबाची जबाबदारी फक्त तुझी नाहीये…आमची सुद्धा आहे.” यानंतर तारिणी सगळ्यात आधी शिवाच्या माहेरी जाते आणि तिच्या कुटुंबीयांची सुटका करते. तर, सासरच्या मंडळींना वाचवण्यासाठी शिवा स्वत: जाते. पण, इतक्यात मागून सुहासची माणसं तिच्या डोक्यावर वार करतात. यामुळे तिच्या डोक्याला जखम होऊन ती बेशुद्ध होते. शिवाची अवस्था पाहून सगळ्यांना अश्रू अनावर होतात. सगळेजण तिची काळजी करत असतात. इतक्यात तिथे तारिणी येते आणि शिवाला लढण्याचं बळ देते. शिवाला शुद्ध आल्यावर या दोघी मिळून सुहासच्या गुंडांना चांगलाच धडा शिकवतात.

अशाप्रकारे सुहासचं खरं रूप सर्वांसमोर उघड होऊन या मालिकेचा शेवट आनंदी होणार आहे. सगळं कुटुंब एकत्र येऊन तारिणीचे आभार मानेल आणि त्यांना शिवाचीही किंमत समजेल. मालिकेचा हा अखेरचा भाग ८ ऑगस्टला प्रसारित केला जाईल.

दरम्यान, ८ ऑगस्टला ‘शिवा’ने सर्वांचा निरोप घेतल्यावर ११ ऑगस्टपासून शिवानी सोनारची ‘तारिणी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाईल.