Zee Marathi Serial Off Air Updates : ‘झी मराठी’ वाहिनीवर ११ ऑगस्टपासून दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. यामध्ये तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि शिवानी सोनारच्या ‘तारिणी’ मालिकेचा समावेश आहे. आता या दोन नव्या मालिका सुरू होण्यापूर्वी वाहिनीवर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. एकूण ३ मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. तर, दीड वर्षांपासून सुरू असलेली १ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण दीड वर्षांपूर्वी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. जवळपास दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ‘शिवा’ मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे.
केव्हा प्रसारित होणार शेवटचा भाग…
‘शिवा’ मालिकेची वेळ काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली होती. सुरुवातीला ही मालिका ९ वाजता प्रसारित केली जायची. मात्र, ‘कमळी’ ही नवीन मालिका सुरू झाल्यापासून आता ‘शिवा’ मालिका सध्या रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते. येत्या ११ ऑगस्टपासून याच वेळेला शिवानी सोनारच्या नव्या ‘तारिणी’ मालिकेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे ‘शिवा’ मालिका सर्वांचा निरोप घेईल.
गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कलाकार ‘शिवा’च्या फॅन पेजने शेअर केलेल्या पोस्ट रिशेअर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये चाहत्यांनी मालिका बंद करू नका अशी विनंती केल्याचं पाहायला मिळत आहे. पण, समोर आलेल्या माहितीनुसार ‘शिवा’ मालिकेचा शेवटचा भाग ८ ऑगस्टला प्रसारित केला जाईल. ४९१ भागांसह ही मालिका सर्वांचा निरोप घेईल.
दरम्यान, सेटवर सध्या शेवटच्या भागांचं शूटिंग सुरू आहे. सगळे कलाकार यादरम्यानचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ‘शिवा’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये पूर्वा आणि शाल्व यांच्यासह सविता मालपेकर, मानसी म्हात्रे, सृष्टी बाहेकर, अनुपमा ताकमोघे, अंगद म्हसकर अशा बऱ्याच कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.