Zee Marathi Shiva Serial Off Air : मराठी टेलिव्हिजन विश्वात काम करणारे कलाकार रात्रंदिवस मेहनत करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा १२ तासांहून अधिक वेळ सुद्धा शूटिंग करावं लागतं. त्यामुळे शूटिंगचा सेट हा या कलाकारांनी जणू दुसरं घरच असतं. त्यामुळे जेव्हा मालिकेचा शेवट जवळ येतो, तेव्हा अतिशय जड अंत:करणाने या कलाकारांना त्या वास्तूचा निरोप घ्यावा लागतो. याशिवाय आवडत्या मालिका संपणार अशी बातमी आल्यावर प्रेक्षकही नाराज होतात.
आपल्या आवडत्या मालिका संपणार याचं दु:ख प्रेक्षकांना देखील होतं. काही दिवसांपूर्वीच याचं उदाहरण पाहायला मिळालं होतं. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ऑफ एअर झाल्यावर, या मालिकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता लवकरच या वाहिनीवरील ‘शिवा’ मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. ‘शिवा’ मालिकेचे फॅन पेजेस अलीकडे दररोज वाहिनीला ही मालिका संपवू नका अशी विनंती करत आहेत. पण, दोन नव्या मालिका सुरू होणार असल्याने ‘शिवा’ लवकरच सर्वांचा निरोप घेईल.
‘शिवा’ मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. जवळपास दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ‘शिवा’ मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे.
शिवा मालिका घेणार सर्वांचा निरोप
माहितीनुसार, ‘शिवा’ मालिकेचा शेवटचा भाग ८ ऑगस्टला प्रसारित केला जाईल. ४९१ भागांसह ही मालिका सर्वांचा निरोप घेईल. याशिवाय या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकने देखील सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंगचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
“सगळं काही बदलण्याआधी One Last Time…” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं आहे. एका फोटोत पूर्वा तिच्या ‘शिवा’ मालिकेतील लूकप्रमाणे शर्ट आणि जीन्स घालून शूटिंगसाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, अभिनेत्रीने दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सेटवरची झलक सर्वांना दाखवली आहे. “२ ऑगस्ट २०२५ One Last Time…प्रत्येक क्षण मी मनात साठवून ठेवणार आहे.” असं अभिनेत्रीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘शिवा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर ‘झी मराठी’वर येत्या ११ ऑगस्टपासून शिवानी सोनारची ‘तारिणी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे.