Shivani Sonar on bonding with Swaraj Nagargoje: अभिनेत्री शिवानी सोनार व स्वराज नागरगोजे हे नुकतेच ‘तारिणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेला अल्पावधीत प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मालिका प्रदर्शित होण्याआधीपासूनच या मालिकेच्या कथानकाची आणि कलाकारांबाबत चर्चा होताना दिसत होती. अभिनेत्री शिवानी सोनार आणि स्वराज नागरगोजे यांनी ‘तारांगण’शी नुकताच संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बॉण्डिंगबद्दल वक्तव्य केले.

शिवानी सोनार म्हणाली, “घोडबंदरच्या ट्रॅफिकमुळे आमच्या दोघांमधील बॉण्डिंग मजबूत झालं आहे, कारण काही दिवसांपूर्वी स्वराज मालाडला राहत होता. मी बोरिवलीला राहत होते, त्यामुळे आम्ही दोघं एकत्र, एका गा़डीतून जायचो. मग सुरुवातीला आम्हा दोघांनाही असं वाटत होतं की एकमेकांशी काय बोलणार? कारण आम्ही एकमेकांसाठी अगदीच नवीन होतो. मग आम्ही एकमेकांना प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि मग आम्ही बोलायला लागलो.”

तसेच शिवानीने खरी बंदूक हातात घेण्याचा अनुभवही सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “खरी बंदूक हातात घेण्याचा हाच अनुभव आहे की तिचं वजन आणि आवाज, या दोन्ही गोष्टींमुळे आम्हाला आश्चर्य वाटले होते. आता खूप वेळा हातात बंदूक घेतल्यानंतर कानांना आवाजाची तसेच शरीराला त्या वजनाची सवय झाली आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण आता वाटत नाही.”

पुढे शिवानीने सोशल मीडियावरील वाढत चाललेल्या नकारात्मक आणि फेक बातम्यांबद्दल वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली की, सध्या सोशल मीडिया आणि मोबाईल हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले आहेत. आपलं वर्तमानपत्र वाचणं कमी झालेलं आहे. टीव्ही बघणं कमी झालेलं आहे. आपण टीव्हीवर बातम्या बघत नाही. आपले आई-वडील असले तर थोडा वेळ बघतो, पण आपण मुखत्वे सोशल मीडियावरच बातम्या बघतो.

सोशल मीडियावर ज्या बातम्या येतात, त्या मला फार नकारात्मक वाटतात. त्यांचं प्रमाण खूप जास्त होत असल्याचं मला वाटतं. सोशल मीडिया उघडल्यानंतर ३-४ बातम्या तर अशा असतातच जिथे अपघात, अघोरी प्रकार घडलेले असतात. ते सर्वांसमोर यायला नकोत असं मी म्हणत नाही. त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. असे प्रकार घडू नयेत म्हणून लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण, या सगळ्यात कधी कधी खोट्या बातम्याही खूप व्हायरल होतात, त्यावर नियंत्रण आणलं पाहिजे,” असे शिवानी म्हणाली.

दरम्यान, शिवानी सोनार व स्वराज नागरगोजे या मालिकेत स्पेशल ऑफिसरच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.