Zee Marathi Tarini Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून ‘तारिणी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सर्वांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या ‘तारिणी’ची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
शिवानीसह या मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका साकारतोय अभिनेता स्वराज नागरगोजे. यापूर्वी या अभिनेत्याने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या सिनेमात देखील त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
‘तारिणी’ मालिकेच्या निमित्ताने अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच अॅक्शन हिरोच्या भूमिकेत झळकणार आहे. स्वराज या मालिकेत केदारची भूमिका साकारणार आहे. तो एक अंडरकव्हर कॉप असतो. त्याला समाजामध्ये जी गुन्हेगारी वाढतेय, त्यावर निर्बंध आणायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराजला त्याच्या बाबांना शोधायचं आहे.
स्वराज या नव्या मालिकेविषयी आणि त्याच्या भूमिकेविषयी सांगतो, “मी आयुष्यात पहिल्यांदाच अॅक्शन सीन आणि गन फायरिंग केली आहे. मला माहिती नव्हतं की गन फायर करताना इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज होतो. बंदुकीतून गोळी झाडल्यावर मी आणि शिवानी आम्ही दोघेही १०-१५ सेकंदासाठी सुन्न झालो होतो. आम्हाला काहीच कळत नव्हतं, कानठळ्या बसल्या आणि त्यानंतर आम्ही दोघेही हसायला लागतो. हा प्रोमो शूट करतानाचा अनुभव मी कधीही विसरणार आहे.”
अभिनेता पुढे म्हणाला, “तारिणी’ मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे यांनी मला ऑडिशनसाठी कॉल केला होता. पण, मी एका दुसऱ्या कामात व्यग्र असल्यामुळे मला ऑडिशनला जाणं शक्य नव्हतं आणि ते मिस झालं असं जवळपास दोनवेळा झालं. पण, मग मी त्यांना एक विनंती केली की घरून व्हिडीओ बनवून ऑडिशन पाठवली तर चालेल का? मला जी माहिती सांगितली गेली त्यावरून जाणवलं होतं की, अंडरकॉप एजंटची भूमिका आहे. त्यामुळे अशा भूमिका साकारताना आपलं व्यक्तिमत्त्व सुद्धा तेवढंच प्रभावी दिसलं पाहिजे. त्यामुळे मी फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. ज्यावेळी सिलेक्शन झाल्याचा फोन आला, तेव्हा माझी लूकटेस्ट झाली. पुढे, मला आणखी एक ऑडिशन द्यायची होती. पण, तेवढ्यात ‘झी मराठी’मधून शर्मिष्ठा मॅमचा मला कॉल आला की, स्वराज या भूमिकेसाठी लॉक झालाय. मला त्याक्षणी काय रिअॅक्ट ते सुद्धा कळत नव्हतं…इतका मी आनंदी झालो होतो. सगळ्यात आधी ही गोष्ट आई-बाबांना सांगितली, त्यांनाही आनंद झाला. माझी एक जवळची मैत्रीण आहे तिलाही सांगितलं. माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत त्यांनी मला आधीच सांगितलं होतं, काळजी करू नकोस तुझं सिलेक्शन नक्की होईल आणि तसंच झालं.”
“प्रोमो प्रदर्शित झाल्यावर माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचे फोन आले. जवळपास २४ तासांत प्रोमोला १ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. कंमेंट्समध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद दिला होता. माझ्या भूमिकेचं नाव केदार आहे आणि तो एकटा राहतो. त्याला आई नाहीये पण बाबा आहेत. त्याचे बाबा कोण आहेत हे त्याला माहिती नाहीये कारण, ते लहानपणीच त्याला सोडून गेलेले असतात. मालिकेत केदार त्याच्या वडिलांचा शोध घेताना तुम्हाला दिसेल.” असं स्वराज नागरगोजेने सांगितलं.