Zee Marathi Vin Doghantali Hi Tutena : तेजश्री प्रधानला छोट्या पडद्यावरची सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. अभिनेत्रीच्या आतापर्यंतच्या प्रत्येक मालिकेला घराघरांत भरभरून प्रेम मिळालं आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तेजश्री प्रधानच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. या मालिकेने घराघरांत अधिराज्य गाजवलं होतं. यामध्ये तेजश्रीने ‘जान्हवी’ ही भूमिका साकारली होती.
जान्हवी या पात्राचं हसणं, लाजणं, काहीही हं श्री…असं म्हणणं या सगळ्या गोष्टी प्रेक्षक आजही मिस करत आहेत. आता प्रेक्षकांची लाडकी जान्हवी स्वानंदीच्या रुपात सर्वांच्या भेटीला येणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळेल. याच पार्श्वभूमीवर तेजश्रीला भेटण्यासाठी आणि तिला नव्या मालिकेसाठी शुभेच्छा द्यायला ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवर तिच्या जुन्या मालिकेतील चार सासूबाई पोहोचल्या होत्या. याचा व्हिडीओ ‘झी मराठी’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील सुहिता थत्ते ( नर्मदा – आई ), पूर्णिमा तळवलकर ( कावेरी- बेबी आत्या ), लीना भागवत ( शरयू गोखले – छोटी आई ), स्मिता सरोदे ( सरस्वती – सरु मावशी ) या जान्हवीच्या चार सासूबाई खास स्वानंदीला भेटायला आल्या होत्या.
या सगळ्याजणी सर्वप्रथम स्वानंदीला तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देतात. यानंतर नर्मदा तिला आईआजीने बनवलेले पौष्टिक लाडू देते आणि सांगते, “आमची जान्हवी जेव्हा आमच्या घरी लग्न करून आली तेव्हा तुझ्यासारखीच होती. त्यात आम्ही सहा सासवा घरी होतो. तुला सुद्धा सगळ्या गोष्टी जमतील काही काळजी करू नकोस… असं म्हणतात माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून असतो. त्यामुळे तुला छान जेवण बनवता आलं की तू सर्वांचं मन जिंकून घेशील. घरातील सगळी माणसं हाताच्या बोटाप्रमाणे वेगवेगळी असतात त्यामुळे या सगळ्यांशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं.”
यानंतर नर्मदा, बेबी आत्यावर स्वानंदीसाठी नवीन साड्या घेण्याची जबाबदारी सोपवते. “लग्न कुठे करणार बाहेरगावी की इथे?” असा प्रश्न विचारल्यावर स्वानंदी म्हणते, “खरंतर समररावांचं सगळंच ठरलंय.” यावर बेबी आत्या स्वानंदीला चिडवत म्हणते, “काय गं आतापासून समर राव…” हे ऐकून स्वानंदी काहिशी लाजते आणि म्हणते “काहीही हं आत्या!” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेवटी या सगळ्या जणींनी मिळून “होणार मी…” मालिकेच्या टायटल ट्रॅकवर डान्स करतात.
“जुने दिवस पुन्हा आठवले”, “किती सुंदर प्रोमो आहे”, “थँक्यू झी मराठी तुमच्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका आजपासून ( ११ ऑगस्ट ) संध्याकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’वर सुरू होणार आहे.