Tejashri Pradhan New Serial Vin Doghantali Hi Tutena Promo : ‘झी मराठी’च्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची तारीख अद्याप वाहिनीने जाहीर केलेली नाही. मात्र, तेजश्रीचं कमबॅक असल्याने या मालिकेला प्राइम टाइम मिळण्याची दाट शक्यता आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तेजश्री ‘स्वानंदी’ तर, सुबोध ‘समर’ ही भूमिका साकारताना दिसेल. प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघंही एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये भेटतात. आपल्या भावा-बहिणीचं लग्न कुठे होईल, कसं होईल याची चर्चा करतात. पण, यादरम्यान स्वत:च्या लग्नाबद्दल काहीच ठरवत नाहीत. स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते. तर, समर बहिणीसाठी स्वानंदीशी लग्न करणार असतो.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या पहिल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच तेजश्रीच्या कमबॅकबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांना या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून हिंदीतल्या एका लोकप्रिय मालिकेची आठवण झाली आहे. अनेकांनी तेजश्रीची नवीन मालिका हिंदी सीरियलची कॉपी असल्याचं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

“फायनली ‘बडे अच्छे लगते है’चा मराठी रिमेक आला”, “ही मालिका बडे अच्छे लगते है सीरियलाचा रिमेक वाटतेय पण, तेजश्री असल्याने आम्ही ही मालिका जरूर पाहणार”, “मालिका भलेही रिमेक असूदेत पण कलाकार खरंच खूप चांगले घेतले आहेत त्यामुळे आपण मालिकेला सपोर्ट केला पाहिजे”, “बडे अच्छे लगते है मराठीमध्ये आलेली दिसतेय”, “हिंदीची कॉपी का केली?” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
zee marathi
तेजश्रीच्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, आता तेजश्रीच्या नव्या मालिकेचा मुहूर्त केव्हा पार पडणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येतील. तेजश्री आणि सुबोधच्या या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सर्वांवर भारी पडेल असा अंदाज बांधला जात आहे.