Vin Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Launch Date : तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला असून, मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन् वेळ वाहिनीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तेजश्रीच्या या नव्या मालिकेत कोण-कोण झळकणार जाणून घेऊयात…
तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. या मालिकेत तेजश्री स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारेल आणि सुबोध भावे समर राजवाडेच्या भूमिकेत झळकणार आहे.
स्वानंदी आणि समर यांचे भाऊ-बहीण लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतात. याचवेळी समर-स्वानंदीचा लग्नसोहळा देखील थाटामाटात पार पडतो. मालिकेत स्वानंदी म्हणजेच तेजश्रीच्या भावाची भूमिका ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेता राज मोरे साकारणार आहे. तर, सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्णिमा डे झळकणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार
तेजश्री आणि सुबोध यांच्यासह नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या, किशोरी अंबिये, शर्मिला शिंदे, राज मोरे, पूर्णिमा डे, सानिका काशीकर, आशय कुलकर्णी, किशोर महाबोले आणि भारती पाटील अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील बरीच स्टारकास्ट तेजश्रीच्या नव्या मालिकेत झळकणार आहे.
समर आणि स्वानंदी या दोघांच्या आवडीनिवडी खूपच वेगळ्या असतात. आपल्या भावंडांच्या सुखासाठी या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतलेला असतो. या दोघांच्या नात्याची ‘वीण’ कशी एकरुप होणार याचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेची वेळ
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका ११ ऑगस्टपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. आता या स्लॉटला सध्या सुरू असलेल्या ‘पारू’ मालिकेचं काय होणार? ‘पारू’ संपेल की वेळ बदलेल याची माहिती लवकरच वाहिनीकडून दिली जाईल.
दरम्यान, तेजश्री व सुबोध भावेचं कमबॅक असल्याने या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या नव्या मालिकेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.