Zee Marathi Tula Japanar Ahe Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवर ६ महिन्यांपूर्वी ‘तुला जपणार आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचं थ्रिलर कथानक पहिल्या दिवसापासून चर्चेचा विषय ठरलं होतं. या मालिकेतील खलनायिका माया आणि मंजिरी दोघी मिळून अंबिकाचा खून करतात आणि अथर्व-अंबिकाला कायमस्वरुपी एकमेकांपासून वेगळं करतात.
अंबिकाचं आपल्या नवऱ्यावर आणि लेकीवर मनापासून प्रेम असतं. त्यामुळे जोपर्यंत सत्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत तिचा आत्मा ‘रामपुरे’ कुटुंबीयांच्या घरात वावरत असतो. अंबिका वेळोवेळी सगळ्या वाईट घटनांपासून अथर्व आणि वेदाचं संरक्षण करत असते. खरंतर, अथर्वशी लग्न करून सगळं स्वत:च्या ताब्यात घ्यायचं आणि त्यानंतर वेदाचाही काटा काढायचा असा क्रूर प्लॅन मायाचा असतो. पण, अंबिकामुळे तिच्या कोणत्याच प्रयत्नांना यश मिळत नाही. यानंतर काही दिवसांनी अथर्वच्या आयुष्यात मीराची एन्ट्री होते. ही मीराच अंबिकाची बहीण असते.
मीरा आयुष्यात आल्याने वेदा काहीशी आनंदी होती. पण, तिची आई गेल्यापासून वेदा तिच्या बाबाशी म्हणजेच अथर्वशी काहीच बोलत नसते. त्यांच्यात बापलेकीचं कोणतंच नातं उरलेलं नसतं. वेदा अंबिकाच्या आठवणीत प्रचंड दु:खी असते. पण, मीराच्या येण्याने सगळं काही बदलतं. ती वेदाचं मतपरिवर्तन करते आणि ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण मालिकेत अखेर ६ महिन्यांनी आलेला आहे. वेदा अथर्वचा बाबा म्हणून पुन्हा एकदा स्वीकार करणार आहे. इतकंच नव्हे तर ती कान पकडून बाबाची माफी देखील मागणार आहे.
आय लव्ह यू बाबा…
अथर्व त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यास नकार देतो. इतक्यात मीरा येते आणि ही सगळी तयारी कोणत्या तरी खास व्यक्तीने करायला सांगितली होती असं सांगते. अथर्व समोर पाहतो तर जिने उतरून वेदा येत असल्याचं त्याला पाहायला मिळतं. वेदा भावुक होऊन तिच्या बाबाला म्हणते, “आई गेल्यापासून तू सुद्धा अगदी आईसारखी माझी काळजी घेतलीस. माझा बाबा माझ्यावर कधीच चिडला नाही. मीच त्याच्यावर रागावून बसले. सॉरी बाबा, यापुढे मी तुझ्यावर कधीच रागावणार नाही… आय लव्ह यू बाबा”
यानंतर अथर्व लेकीला घट्ट मिठी मारतो आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. बऱ्याच महिन्यांनंतर बापलेकीमधला दुरावा मिटलेला असतो. यावेळी मीराला अश्रू अनावर होतात. तसंच दुरून सगळं पाहणाऱ्या अंबिकाचेही डोळे पाणावतात. याशिवाय अथर्वची बहीण अनन्या सुद्धा खूप आनंदी होते. हा हृदयस्पर्शी प्रोमो नेटकऱ्यांच्या सुद्धा पसंतीस उतरला आहे.