Mahima Mhatre on her nature: नवरात्र म्हणजे रंग, भक्ती, उत्साह आणि देवीच्या विविध रूपांमधून प्रकटणाऱ्या अपार शक्तीचा उत्सव आहे. देवीच्या विविध रुपांचे महत्व सांगितले जाते. असे सण उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. अनेक कलाकार देवीची मनोभावे पूजा करतात. आराधना करतात.

आता ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत मीरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रेने तिला देवीच्या महागौरी या रुपाबद्दल आणि तिच्या स्वभावाची सीन करताना कशी मदत होते, याबद्दल वक्तव्य केले आहे.

“ती पवित्रतेचं आणि सौम्यतेचं प्रतीक…”

मराठी सिरिअल ऑफिशिअलला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “मी महागौरीशी जोडली गेली आहे, असं मला वाटतं. कारण तिच्यात शांती, संयम आणि स्थिरता आहे. ती पवित्रतेचं आणि सौम्यतेचं प्रतीक आहे. माझा स्वभावही शांत असून मी थोडी अंतर्मुख आहे.”

पुढे महिमा म्हणाली, “हा स्वभाव मला शूटिंगदरम्यान खूप मदत करतो. कारण एखादा सीन करताना मन शांत आणि एकाग्र असेल तर त्याचा परिणाम उत्तम होतो. जिथे मतभेद असतात, तिथे वाद होण्याआधीच मी ते सोडवण्याचा प्रयत्न करते.”

“मी फार एकाग्र आणि स्पष्ट विचारांची आहे. मला माझ्या आयुष्यात काय हवे हे बऱ्यापैकी माहिती आहे. एक कलाकार म्हणून माझी दिनचर्या खूप व्यग्र असते आणि त्यात गोष्टी सांभाळण्यासाठी स्थिरता खूप गरजेची असते.”

“महागौरी, संयमाचंही प्रतीक आहे. कलाकार म्हणून आपण ऑडिशन, सिलेक्शन अशा अनेक टप्प्यांतून जातो आणि त्यासाठी संयम लागतो. तसंच आयुष्यात कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचे मत व्यक्त केले.

महिमा म्हात्रेने तुला जपणार आहे मालिकेतील मीरा ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मीरा ही हळवी पण तितकीच खंबीर आहे. महिमा या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे.