Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: मालिका म्हटलं की, त्यामध्ये ट्विस्ट येणार हे ठरलेलंच असतं. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पुढे काय होणार, याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते.

आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतही सतत नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. कधी स्वानंदी व समर यांच्यात कडाक्याचे भांडण होते, तर कधी अधिरा व रोहनसाठी ते समजुतीने एकत्र येऊन विचार करताना दिसतात. कधी समरच्या निर्णय, विचारांमुळे स्वानंदीचा संताप अनावर होतो; तर कधी स्वानंदीच्या वागण्याचा समरला त्रास होतो.

रोहन हा स्वानंदीचा भाऊ आहे; तर अधिरा ही समरची बहीण आहे. ते दोघेही आपापल्या भावंडांवर खूप प्रेम करतात. रोहन व अधिराचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच रोहनने एक अट ठेवली आहे. ती अट म्हणजे स्वानंदीचे म्हणजेच त्याच्या लाडक्या नंदूताईचे लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही.

रोहन व अधिराच्या लग्नाला उशीर होऊ नये म्हणून रोहनची अट ऐकल्यानंतर समरने स्वानंदीच्या लग्नाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. तो तिच्यासाठी विविध स्थळे शोधताना दिसत आहे. मात्र, स्वानंदीला त्याची पद्धत पटत नाही. आता या सगळ्यात समरने स्वानंदीचे स्वयंवर करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी त्याने तयारीदेखील केली असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट

झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदी समरच्या ऑफिसमध्ये आली आहे. तिथे स्वानंदीचे स्वयंवर असे मोठ्या अक्षरात लिहिलेला एक बोर्ड तिला दिसतो. त्याखाली अटीदेखील लिहिल्या असून, त्याशेजारी तिचा छानसा फोटो तिला दिसतो. ते पाहून स्वानंदीला धक्का बसतो. ती तेथील रिसेप्शनिस्टला विचारते की, मला समर राजवाडेसर कुठे भेटतील? ती मुलगी तिला हाताने इशारा करीत जवळच असल्याचे सांगते. स्वानंदी बघते की तिथे स्टेज आहे आणि त्यासमोर काही मुले बसली आहेत. स्टेजवरून समर सर्वांना सांगत आहे की, तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी स्वानंदी सरपोतदार इथे येतील. तितक्यात त्याला स्वानंदी दिसते. तो म्हणतो की, स्वानंदी सरपोतदार आल्या. तिला पाहून तेथील सर्व मुले उठून उभे राहतात.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, समर स्वानंदीला म्हणतो की, हा सगळा स्वयंवराचा थाट तुमच्यासाठी रचला आहे. स्वानंदी चिडून त्याला “स्वयंवर?” असे म्हणते. समर तिला म्हणतो, “मुलं बघा केवढी आली आहेत”. स्वानंदी त्याला म्हणते की, तुम्ही आधी बाजूला चला. मला तुमच्याशी बोलायचं आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, समरने आपल्यासाठी आयोजित केलेलं स्वयंवर पाहून ‘काय करेल स्वानंदी?’, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, मालिकेत काय ट्विस्ट असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.