Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: स्वानंदी व समर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अधिरा व रोहनला सुख व आनंद मिळावा यासाठी समर व स्वानंदी यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत आता लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडत असल्याचे दिसते.
काही दिवसांपूर्वीच जेव्हा स्वानंदीचा साखरपुडा मोडला, त्यावेळी तिच्या भावाने रोहनने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, त्याच्या ताईचे लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणार नाही. रोहनच्या बोलण्याने दुखावल्या गेलेल्या अधिराने स्वत:ला दुखापत करून घेतली. त्यानंतर परिस्थिती पाहून कुटुंबाच्या आनंदासाठी अधिराचा भाऊ समर आणि रोहनची बहीण स्वानंदी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आता लग्नाआधीच्या विविध समारंभांना सुरुवात झाली आहे. त्यात छोट्या-मोठ्या गमतीजमती घडताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
मेंदीच्या कार्यक्रमात काय घडणार?
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अधिराला समर सांगतो की, निकिताने मेंदीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी केली आहे. त्यावर अधिरा त्याला सांगते की, मी एकटी मेंदी काढणार नाही. तुलाही काढावी लागेल. त्यावर समर तिला म्हणतो, “अजिबात नाही.” समरचे बोलणे ऐकून अधिरा त्याला म्हणते की, मी नंदूताईला फोन करते. अधिरा स्वानंदीला म्हणजेच नंदूताईला फोन करते आणि म्हणते, “पिंट्यादादा किती भाव खातोय. आता जर त्याने मेंदी काढली नाही, तर मीसुद्धा मेंदी काढणार नाही. तू त्याला समजावून सांग.” त्यानंतर अधिरा फोन नेऊन समरकडे म्हणजेच तिच्या पिंट्यादादाकडे देते.
स्वानंदीशी बोलताना समर म्हणतो, “हा मूर्खपणा आहे. मेंदी वगैरे काय?”, त्यावर स्वानंदी त्याला समजावत सांगते, ” आता काही दिवसांत तुमच्या घरातील आनंदाचा धबधबा आमच्या घरी येणार आहे. अधिरा म्हणत असेल, तर चार ठिपके काढा. बघा म्हणजे तुम्ही ठरवा.” समर मेंदी काढून घेत असल्याचे प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते.
आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘अधिराचा गोड हट्ट पूर्ण करीत समरचेही हात मेंदीने रंगणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता या कार्यक्रमादरम्यान काय काय गमतीजमती घडणार, समरची मल्लिकाकाकू आणि तिचा मुलगा अंशुमन आणखी काय कारस्थान करणार, याबरोबरच हा लग्नसोहळा कसा पार पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
