Vin Doghantali Hi Tutena Promo : तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रसारित करण्यात आला. या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तेजश्री जवळपास ७ महिन्यांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार असल्याने प्रत्येकाच्या मनात या मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाल्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘असा’ होता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा पहिला भाग

तेजश्री प्रधान या मालिकेत स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारत आहे. स्वानंदी ट्रॅव्हल कंपनीत कामाला असते याशिवाय तिला समाजकार्याची सुद्धा प्रचंड आवड असते. उत्तम काम केल्यामुळे तिला कंपनीत प्रमोशन मिळतं. यावेळी स्वानंदीची कलिग ( स्नेहल शिदम ) तिला लग्नावरून टोमणे मारत असल्याचं मालिकेत पाहायला मिळालं.

दुसरीकडे, समर बहिणीच्या आनंदासाठी संपूर्ण राजवाडा खरेदी करतो. तिला नुकतीच मुलगी झालेली असते. चिमुकल्या भाचीच्या अन्नप्राशन कार्यक्रमात तिला पहिला घास भरवण्याचा मान ‘मामा’ म्हणून मला मिळणार याची समरला खात्री असते. पण, प्रत्यक्षात कार्यक्रमात भलतंच घडतं. हा मान अंशुमनला देण्यात येणार आहे.

मालिकेत पुढे काय घडणार?

समरला त्याच्या घरचे नेहमी अपमानित करतात हे त्याच्या आजीला म्हणजेच नलिनी राजवाडे ( सुलभा ) यांना लक्षात येतं. त्या समरची चांगलीच कानउघडणी करतात. या लोकांना तू फक्त कामापुरता हवा असतोस. बाकी मान वगैरे द्यायची वेळ येते तेव्हा भलतंच कोणीतरी पुढे जातं. तू आता लग्न कर कारण, तुझ्या आयुष्यात तुला सांभाळणारी व्यक्ती असणं फार गरजेचं आहे असं आजी समरला सांगते. याशिवाय निकिता ( शर्मिला शिंदे ) सुद्धा त्याला लग्नाचा विचार करण्याविषयी समजवणार आहे.

स्वानंदी घरी आल्यावर आपल्या प्रमोशनची बातमी वडिलांना देते. लेकीचा आनंद पाहून ते देखील फार खूश होतात. पण, यावेळी स्वानंदीला तिची आई आणि बहीण दोघीजणी मिळून ‘काकूबाई’ म्हणत हिणवतात. आता काही हिचं लग्न होणार नाही असंही म्हणतात. यावेळी स्वानंदीला तिचे वडील धीर देतात. तू ज्या घरात जाशील तिथे नंदनवन तयार होईल, असं ते म्हणतात. पण, स्वानंदी देखील म्हणते आता कोण करणारे माझ्याशी लग्न?

मालिकेत अजून समर आणि स्वानंदीची पहिली भेट झालेली नाही. आता दोघांची भेट केव्हा व कशी होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. ही मालिका ‘झी मराठी’वर रोज सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.