टॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध फिल्म निर्माते आणि पत्रकार बीए राजू यांचं निधन झालंय. ते ५७ वर्षाचे होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नी दिग्दर्शिका जया यांचं निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आहेत. त्यातील एक मुलगा शिवा कुमार याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बीए राजू यांना करोना झाला होता. गेल्या एक आठवड्यापासून त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू होते.

फिल्म निर्माते बीए राजू यांचा मुलगा शिवा कुमारने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. बीए राजू यांच्यावर करोनाचे उपचार सुरू असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने आज सकाळी त्याचं निधन झालं.

बीए राजू हे टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील दररोजचे व्यवसाय, व्यापार आणि अनेक बदलांमधील महत्त्वाचे भाग बनले होते. सोबतच ते लोकप्रिय तेलुगु फिल्म पत्रिका ‘सुपरहिट’चे संस्थापक आणि संपादक देखील होते. गेल्या चार दशकांपासून त्यांनी त्यांच्या करियरमध्ये शेकडो चित्रपटांचे पीआर देखील सांभाळले आहेत. टॉलिवूडचे सुपरस्टार महेश बाबू यांचं देखील पीआरओ म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. त्यांनी अनेक बडे कलाकार, प्रोडक्शन हाऊस आणि अभिनेत्रींसाठी देखील पीआरओच्या रूपात काम केलेलं आहे. यात प्रभास पट्टन, नागार्जुन आणि ज्यूनिअर एनटीआर यांच्या नावांचा देखील समावेश आहे.

बीए राजू यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण टॉलिवूड शोकाकुळ झालंय. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सुपरस्टार महेश बाबू यांनी देखील ट्विट करत बीए राजू यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे. यात त्यांनी लिहिलंय, “बीए राजू यांच्या निधनाने खूप दुःखी झालोय…यावर विश्वास ठेवणं मला खूप अवघड जातंय…आम्ही दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो…किती तरी वर्ष आम्ही एकत्र काम केलंय.”

सुपरस्टार महेश बाबू यांच्या व्यतिरिक्त त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर, काजल अग्रवाल, ज्यूनिअर एनटीआर यांसारख्या अनेक बड्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बीए राजू यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

फिल्म निर्मात बीए राजू यांच्या निधनाने टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मितभाषी असलेले फिल्म निर्माते बीए राजू यांचे तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील सर्वच कलाकारांसह स्नेहपूर्ण संबंध होते.